विक्रम! विपक्ष नेता, उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीपद भुषविणारे एकमेवाद्वितीय,पहिलाच मोठा निर्णय आला समोर
अजित पवारांचाही सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम
मुंबई दि-05/12/2024, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी राज्यानं नऊ उपमुख्यमंत्री पाहिले. फडणवीस दहावे उपमुख्यमंत्री ठरले. उपमुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर कोणत्याही नेत्याला आजपर्यंत मुख्यमंत्री होता आलेलं नाही. ती कामगिरी फडणवीसांनी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या नावावर अनोखा विक्रम जमा झालेला आहे. 30 जून 2022ते 05 डिसेंबर 2024 या कालावधीत फडणवीस त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अजित पवार यांनी आजपर्यंत सर्वाधिक सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे.देशात कोणत्याही व्यक्तीने एखाद्या राज्यात आजपर्यंत इतक्या वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही.सर्वात विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक दृष्टीने महत्त्वाचे अजिबात नाही.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी
पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.