जळगावचे लाचखोर RTO दीपक पाटील यांची वादग्रस्त कुंडली, 73 लाखांचे झोल प्रकरणही आले चर्चेत
लाचखोरांमध्ये कायद्याची भीती कमी झालीये ?
जळगाव,दि-05/12/2024, जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाला प्रादेशिक परिवहन विभागाचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी प्रथमच कोल्हापूर येथील उपप्रादेशक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची पदोन्नतीवर जळगावचे मुख्य परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली होती.यापूर्वी त्यांचा नगर बारामती येथील कार्यकाळ विविध कारणांनी चर्चेत राहिलेला होता.
दीपक पाटील यांनी यापूर्वी नंदुरबार नगर बारामती आणि कोल्हापूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत राहिलेले आहे. सन 2010 ते 2012 च्या दरम्यान नगर येथील कार्यकाळात विनाक्रमांकाची चार चाकी गाडी चालवून एका दुचाकीला धडक दिल्याने त्यांचे ते प्रकरण राज्यभर चर्चेत आलेले होते. दरम्यान वाहनांचा 73 लाख रुपयांचा सेवा कर गोळा करूनही तो शासकीय त्वरित न भरल्याचा ठपका आहे त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी त्यांची राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे विभागीय चौकशी सुद्धा झालेली आहे. मात्र त्याचा अहवाल समोर आलेला नाही. दीपक पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे देखील काही याचिका प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यांचा यापूर्वीचा असलेला कामकाजाबाबतचा वादग्रस्त इतिहास आणि आज त्यांनी त्यांच्याच कार्यालयातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी झालेली अटक यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे.
आज छत्रपती संभाजी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जळगाव परिवहन विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला नवापूर येथे नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून तीन लाखांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून मोठ्या शिताफीने सापळा रचून प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले दीपक पाटील यांना त्यांच्याच कार्यालयात त्यांच्या पंटर मार्फत तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चेचा विषय रंगलेला आहे. यामुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडालेली आहे.जळगाव जिल्ह्यातील अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे लाच घेताना रंगेहाथ सापडल्यानंतर देखील वरिष्ठ स्तरावरून कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्याने याबाबतची प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित असतात. लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भीती राहिली नसल्याचे आजपर्यंत दिसून आलेले आहे.
आज जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात लाच घेतल्याप्रकरणी झालेली कारवाई ही छत्रपती संभाजी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल धस,उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.