अमित शाहांचे ‘ते’ विधानं आणि ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली ; विरोधक प्रचंड आक्रमक
नवीदिल्ली दि-१८/१२/२४,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या कथित विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेससह विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. विरोधकांनी संसदेच्या बाहेरही जोरदार निदर्शने करून सत्ताधाऱ्यांना आज धारेवर धरलेलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यामुळे काँग्रेससह विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी या विधानावरून अमित शाह यांना माफी मागण्याची मागणी केली आहे. आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर हातात डॉ. आंबेडकरांचे फोटो घेऊन जोरदार निदर्शने केली. अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी लावून धरली. त्यानंतर संसदेचं कामकाज सुरू होतात. दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. जयभीमचे नारे देत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. अखेर या गोंधळातच कामकाकज तहकूब करण्यात आलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे.
काय म्हणाले होते अमित शाह ?
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी अमित शाह यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सादर केला होता. या व्हिडीओत अमित शाह हे विरोधकांवर टीका करताना म्हणतात, आंबेडकर आंबेडकर म्हणायची आता एक फॅशन झाली आहे. एवढं जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता. शाह यांच्या याच विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असल्याचं म्हटलेलं आहे.