‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हरवलेल्या मुलांची RPF कडून सुटका, प्रवाशांचे हरवलेले सामानही दिले परत मिळवून
भुसावळ RPF ची दमदार कामगिरी
भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील सुरक्षा दलाने
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जबरदस्त कामगिरी बजावलेली आहे.
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’
रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) ला रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर-२०२४ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने एकूण १०९९ मुलांची (७४० मुले आणि ३५९ मुली) सुटका केली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडले. यामध्ये चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवरील सुटका/पुनर्मिलन करण्यात आलेल्या मुलांचे विभागनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहेत:-
वाचवण्यात/पुनर्मिलन करण्यात आलेली मुले:
मुंबई विभाग – ३७९ मुले (२४२ मुलगे आणि १३७ मुली)
भुसावळ मंडळ – २४७ मुले (१४१ मुलगे व १०६ मुली)
पुणे विभाग – २४६ मुले (२११ मुलगे आणि ३५ मुली)
नागपूर विभाग – १६८ मुले (१०७ मुलगे व ६१ मुली)
सोलापूर मंडळ – ५९ मुले (३९ मुलगे व २० मुली)
नोव्हेंबर-२०२४ मध्ये सुटका करण्यात आलेल्या मुलांची संख्या १२४ होती, ज्यामध्ये ७८ मुलगे आणि ४६ मुलींचा समावेश होता.
त्या तुलनेत जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सुटका/पुनर्मिलन करण्यात आलेल्या मुलांची संख्या १०५३ (७४१ मुलगे आणि ३१२ मुली) होती.
रेल्वे स्थानकावर, कोणत्यातरी वादामुळे, कौटुंबिक समस्या किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आलेल्या मुलांचा शोध प्रशिक्षित आरपीएफ जवानांकडून घेतला जातो. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यासाठी समुपदेशन देतात. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.
ऑपरेशन अमानत
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मूलभूत कर्तव्याव्यतिरिक्त, ऑपरेशन “अमानत” अंतर्गत आरपीएफ ने गरजू प्रवाशांना मदत करणे आणि मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ. यासारख्या मौल्यवान वस्तू परत करणे आणि प्रवाशांच्या मागे राहिलेल्या वस्तू परत करणे हे कर्तव्याच्या पलीकडे जाऊन केलेले कार्य आहे. चालू वर्षात, जानेवारी ते नोव्हेंबर-२०२४ दरम्यान, ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत, आरपीएफ ने ५.२२ कोटी रुपये मूल्याच्या प्रवाशांच्या १४९१ वस्तू पुनर्प्राप्त केल्या आहेत. त्यापैकी ४३.७२ लाख रुपये किमतीच्या १५७ वस्तू केवळ नोव्हेंबर-२०२४ मध्ये पुनर्प्राप्त करण्यात आल्या. त्या तुलनेत जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ४.१२ कोटी रुपयांच्या १४९४ वस्तू पुनर्प्राप्त करण्यात आल्या. यामध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
प्रवाशांच्या पुनर्प्राप्त केलेल्या सामानाचे विभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहेत:
मुंबई विभागातील पुनर्प्राप्त ६४९ वस्तूंची किंमत २.५५ कोटी रुपये आहे
भुसावळ मंडळातील पुनर्प्राप्त २६१ वस्तूंची किंमत १.०७ कोटी रुपये आहे
नागपूर विभागातील पुनर्प्राप्त ३२२ वस्तूंची किंमत ६७.८९ लाख रुपये आहे
सोलापूर विभागातील पुनर्प्राप्त ८८ वस्तूंची किंमत ५१.८६ लाख रुपये आहे
पुणे विभागातील पुनर्प्राप्त १७१ वस्तूंची किंमत ३९.७३ लाख रुपये आहे
या रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, रेल्वे वाहतूक विस्कळीत होणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचाही सामना करावा लागतो. रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, दक्षता आणि सेवा असा देता येईल आणि त्यांनी नेहमीच अत्यंत निष्ठेने, सतर्कतेने आणि धैर्याने आपले कर्तव्य पार पाडले आहे.