Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावनोकरीमहाराष्ट्रमुंबई

जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग चार शिक्षकांसह सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन; एकूण संख्या १९ वर, आणखी आकडा वाढणार

आणखी अनेकांवर कारवाईची टांगती तलवार कायम

जळगाव :दि-23/01/2025, जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई सुरू झाली असून, शुक्रवारी चार प्राथमिक शिक्षकांसह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असून, शासनाची फसवणूक करून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या नोकऱ्यांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांची युआयडी कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे आणि वैद्यकीय तपासणी अहवालांची सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. या तपासणीत काही कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये नमूद दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणीत आढळलेल्या निष्कर्षांमध्ये मोठी तफावत आढळून आली. या प्रकरणी यापूर्वी १३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आज शुक्रवारी आणखी सहा जणांवर कारवाई करण्यात आल्याने निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे.या सर्वांवर शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून, आजपावेतो घेतलेले सर्व वेतन व इतर लाभ वसुल करण्यात येणार आहे.
शुक्रवारी निलंबित करण्यात आलेले कर्मचारी :
राजेश विजय खैरनार – आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रावेर
प्रदीप बगडू ढाके – आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवद, ता. धरणगाव
अजय पुंडलिक शिरसाठ – प्राथमिक शिक्षक, आव्हाणे, ता. जळगाव
ज्ञानेश्वर वेडू चौधरी – प्राथमिक शिक्षक, सुनोदा, ता. रावेर
स्वप्नाली वाल्मिक पाटील – प्राथमिक शिक्षिका, पथराड, ता. धरणगाव
पंकज मगनलाल वाघ – प्राथमिक शिक्षक, नगाव, ता. पारोळा
दरम्यान, दिव्यांग सवलती व आरक्षणाचा लाभ खऱ्या आणि पात्र व्यक्तींनाच मिळावा, यासाठी ही मोहीम सुरू असून, तपासणीत दोषी आढळणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button