ठाकरे घराण्यातील दिराणी जेठाणींची लवकरच राजकारणात ‘एन्ट्री’ ! ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार ‘सामना’ !!
येणाऱ्या काळात ठाकरेंमध्येच जुगलबंदी
मुंबई, दि-25, : सध्या गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज म्हटलेलं आहे. काल पुण्यात असलेले मनोज जरांगे पाटील मुंबईला येईपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. मराठा आरक्षणावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. मनोज जरांगे यांचा हा मोर्चा आज संध्याकाळपर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, अशी विनंती आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.यात महाराष्ट्र पोलिसांना मनोज जरांगे यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पाठवण्याचे आदेश दिले.काहि दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंच्या एका वादग्रस्त विषयाप्रकरणी रश्मी ठाकरे यांनी आदित्य निर्दोष असल्याचे म्हटलेले होते.त्यानंतर त्या सातत्याने माध्यमांसमोर बोलताना दिसत आहे.
रश्मी ठाकरेंची स्त्री शक्ती संवाद यात्रा
कालपरवा नाशिकमध्ये झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या अधिवेशनात रश्मी ठाकरेंची दिमाखात झालेली ‘एन्ट्री’ त्यांचे भविष्यात राजकारणात सक्रिय सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांसाठी स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार असल्याचे म्हटलेले आहे.तसेच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नाशिकमधील याच भर सभेत जाहीरपणे सांगितले की, त्यांना रश्मी ठाकरेंमध्ये माँसाहेब दिसतात. तसेच त्यांची खूप प्रशंसा देखील त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी रश्मी ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही अधिवेशनात उपस्थित राहत नव्हत्या.
ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार ‘सामना’
दरम्यान, मागील वर्षी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचे जेष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे व त्यांच्या घटस्फोटीत पत्नी स्मिता ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव ॲड निहार ठाकरे यांनीही भेट घेतली होती.व आम्हीपण बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारस असल्याचे दर्शवले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच स्मिता ठाकरे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात दिसलेल्या होत्या.यावेळी त्यांचा मुलगा राहुल ठाकरे हा सुद्धा होता. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राहुल ठाकरेंनी विविध शिबिरांच आयोजन करून प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे हे प्रयत्न राजकारणात येण्याचे संकेत असल्याचे शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी म्हटलेलं आहे.
२०२४ हे वर्ष निवडणुकांच वर्ष म्हणून ओळखल जातंय, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका व भविष्यातील येणाऱ्या विविध निवडणुकीत स्वतः रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे गटाकडून,शर्मिला ठाकरे या राज ठाकरे यांच्या मनसेकडून तर स्मिता ठाकरे कुटुंबातील व्यक्तींना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वरील या तिघ कुटुंबातील हल्लीचे संबंध तथा ‘सख्य’ पाहता मुंबईतील काही ठिकाणी ठाकरे विरुद्ध ठाकरे असा ‘सामना’ होण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत.