भुसावळ :तापी नदीतील शेळगाव बॅरेज जलसाठ्यातील प्रदूषणामुळे दुर्मिळ जलचर प्राण्यांचा अधिवास धोक्यात; 3 कासवांचा मृत्यू
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता

भुसावळ- शहराच्या पूर्वेला तापी नदीपात्रात शेळगाव बॅरेजमुळे निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या जलसाठ्यात गंभीर प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. कंडारी गावाच्या हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळवले जात असल्याने हे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. या जलसाठ्यात ब्राह्मणी बदक, पाणकोंबडी, नदीसुरई, पाणमांजर यांसारख्या दुर्मिळ जलचर प्राण्यांचा अधिवास आहे. काही प्रमाणात हे प्राणी दिसून येत असले तरी आता त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या संदर्भात आज भुसावळ नगरपरिषदेच्या बंधाऱ्याच्या भिंतीला लागून तीन कासव मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मृत कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान , भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी यांच्यासह इतर नगरसेवक आज जलसाठ्याच्या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी हे तीन कासव नदीपात्रात मृतावस्थेत आढळले. यामुळे या दुर्मिळ जलचर प्राण्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पर्यावरण अभ्यासक सतीश कांबळे यांनी सांगितले की, सांडपाण्यामुळे तापी नदीपात्रातील जलसाठ्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे कासवांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरून मृत्यू होऊ शकतो. प्रदूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंह राजपूत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर प्रकल्पबाधित गावांमधील नदीपात्रात किंवा पिण्याच्या पाण्याच्या जलसाठ्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर नव्याने प्रस्तावित असलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात एकत्रितपणे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पांतून शुद्ध झालेले पाणी भविष्यात दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रासाठी वापरले जाईल. यामुळे भविष्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
तापी नदी हे भुसावळ शहरासह परिसरातील प्रमुख पाण्याचे स्रोत असून, शेळगाव बॅरेजमुळे साठवले जाणारे पाणी पिण्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. आज याठिकाणी 60% जलसाठा उपलब्ध असून तो यावर्षी 100% उपलब्ध होणार आहे. मात्र, सांडपाण्याच्या थेट विसर्जनामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदीच्या पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होत आहे. स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लवकरात लवकर कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे, जेणेकरून हे दुर्मिळ जलचर प्राणी आणि पाण्याचे स्रोत वाचवता येतील.













