भुसावळ नगरपालिकेत 600 रुपयांची लाच घेताना अभियंता अधिकाऱ्यासह दोघांना अटक, एसीबीची मोठी कारवाई

भुसावळ, दि-23/04/25, भुसावळ शहरातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांचेसह दोन कर्मचाऱ्यांना सहाशे रुपयांची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केल्याने नगरपालिकेत एकच खळबळ उडालेली आहे. सायंकाळी नगरपरिषद कार्यालय बंद होण्याच्या वेळी साधारण सहा वाजेच्या सुमारास सदरील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ही घटना घडलेली असून तीन जणांना याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे. यामुळे भुसावळ नगरपरिषदेतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. आधीच प्रचंड पाणीटंचाईने भुसावळ शहरातील नागरिक त्रस्त असताना त्यांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांसाठी केवळ 600 रुपयांच्या लाचेसाठी त्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकाने थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करून त्यांना चांगलाच धडा शिकवलेला आहे.
सदरील कार्यवाही ही नाशिक विभागीय लाचप्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घाडगे-वालावलकर ,जळगावचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सापळा व तपास अधिकारी श्रीमती नेत्रा जाधव , पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. जळगांव सापळा पथक, सहा पोउपनिरी सुरेश पाटील चालक सहा पोउप.निरीक्षक दिनेशसिंग पाटील, मपोहेकॉ शैला धनगर ,पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने,पो.कॉ प्रदिप पोळ यांच्या पथकाने केलेली आहे. यात पुढील प्रमाणे तीन आरोपी आहेत.
1) शाम समाधान साबळे, वय- 28 वर्ष, धंदा-नोकरी, नगर पालीका भुसावळ पाणीपुरवठा विभाग कंत्राटी कामगार
2) सतिष सुरेशराव देशमुख, धंदा-नोकरी, पाणीपुरवठा अभियंता नेम. पाणीपुरवणा विभाग भुसावळ वर्ग 3
3) शांताराम उर्खडु सुरवाडे , वय 57 वर्ष धंदा नोकरी लिपीक नेम पाणी पुरवठा विभाग भुसावळ वर्ग 4 यांनी मिळून तक्रारदार यांच्याकडे 700 रूपये लाचेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज नगरपालिकेत रोख सहाशे रुपयांची लाच घेताना तिघांना अटक करण्यात आलेली आहे. यातील तक्रारदार हे प्लंबर असून त्याचे प्रत्येक वर्षाला लायसन्स नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी तक्रारदार हे पाणी पुरवठा विभाग भुसावळ येथे गेले असता यातील आरोपी क्र.1 यांनी पंचा समक्ष 700 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आरोपी क्र. 1 यांनी आरोपी क्र.2 यांना कॉल केला असता आरोपी क्र. यांनी 600/- रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे आरोपी क्र.1 यांचेकडेस लाचेची रक्कम 600/- रुपये घेवून गेले असता आरोपी क्र.1 यांनी आरोपी क्र.3 यांना कॉल करून साहेबांनी 600 रुपये घेण्यास सांगितले आहे. असे सांगून त्यांना लाचेची रक्कम घेण्यास सांगितले, त्यानंतर आरोपी क्र.3 यांना सदरची लाच रक्कम स्विकारली म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत वर नमुद आरोपी यांचे विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकारे संबंधित आरोपी अधिकाऱ्यांची घरझडती सुरू आहे. तसेच आरोपी क्र 1 शाम साबळे यांचे अंगझडतीत vivo कंपनीचा मोबाईल मिळून आला, आरोपी क्र 2 सतीश देशमुख पाणीपुरवठा अभियंता यांचे अंगझडतीत 2160 रुपये व वन प्लस मोबाईल,आरोपी क्रमांक 3 यांचे अंगझडतीत 1000 रुपये व vivo कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे,सदर मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील निरीक्षण करण्याची तजवीज ठेवली आहे.