मंत्रीपदाचा राजीनामा देणारे छगन भुजबळ आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित, भुजबळ बनले ‘गले की हड्डी’
भुजबळांचा राजीनामा सरकारसाठी डोकेदुखी
मुंबई दि-५ फेब्रुवारी, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईकडे कूच केल्यानंतर अख्खा महाराष्ट्राच राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या लाखो समाज बांधवांच्या सोबतीने अत्यंत आक्रमक पद्धतीने मुंबईकडे काढलेल्या मोर्चाने सरकार व पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र मराठा तथा कुणबी समाजाला ओबीसींच्या कोट्यातून देण्यात येणाऱ्या आरक्षणाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सुरवातीपासूनच कडाडून विरोध केलेला होता. आणि या मराठा आरक्षणाची अधिसूचना निघाल्यानंतर सुद्धा भुजबळ यांनी अधिसूचनेची संपूर्ण चिरफाड केलेली होती. यामुळे संतापलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, यासाठी जाहीर मागणी केलेली होती. मात्र भुजबळ यांनी परवा एका जाहीर सभेत एक खळबळजनक खुलासा केला होता,की मी १६ नोव्हेंबर रोजीच मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे जाहीर वक्तव्य केलेले आहे.
भुजबळ मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित
मात्र असे असताना आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ हे हजर असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे.याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजा छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारला असला तरी तो अजूनही मंजुरीचा निर्णय घेतला गेला नसल्याचे छगन भुजबळ यांच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील उपस्थिती वरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले शिंदे गटातील आमदार तथा नेते हे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असताना आणि दुसरीकडे भुजबळ हे राजीनामा दिलेला आहे असे जाहीर सांगत असताना सरकारमधील गोंधळ समोर आलेला आहे.
छगन भुजबळ यांचा राजीनामा मंजूर केल्यास शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यावर येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज नाराज होऊन त्याचा प्रणाम निवडणुकीतील माताधिक्यांवर होऊ शकतो असा कयास एकनाथ शिंदे यांचा असू शकतो. त्यामुळे भुजबळ यांचा राजीनामा महायुती तथा शिंदे सरकारला परवडणारा नाही हेच यावरून सिद्ध होत आहे.
छगन भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी समाज ठामपणे उभा आहेत, आणि यावरून येणाऱ्या काळात छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचा मुख्य चेहरा तथा नेता म्हणून समोर येताना दिसून येत आहे. एकीकडे मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध आणि आरक्षणाची लढाई आणखी तीव्र होईल याचे चित्र आता स्पष्टपणे दिसून येत आहे.