मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला अज्ञात बोट धडकली, मुंबईत खळबळ ! सुरक्षा यंत्रणा ॲलर्ट
मुंबई दि-६ फेब्रुवारी, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष उलटूनही अरबी समुद्राची सीमा आज सुद्धा म्हणावी तितकी सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. आजच एक बोटीने कोणतीही पूर्व सूचना न देता थेट गेट वे ऑफ इंडियाला धडक दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे सुरक्षा यंत्रणाही खडबडून जागे झालेल्या आहेत. तीन लोक बोटीवर असल्याची प्राथमिक माहिती असून मुंबई पोलीस,आयबी, एनाय पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.ही बोट कुवेतची असल्याची माहिती समोर आलेली असून यातील व्यक्तींचा काही घातपात करण्याचा इरादा होता का ? या अनुषंगाने संरक्षण यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संपूर्ण गेटवे ऑफ इंडिया परिसर खाली करण्यात आलेला असून या परिसरातील सर्वच बोटी व जहाजांची नौदलाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही तटरक्षक दलाकडून भारतीय नौदलाकडे देण्यात आलेली होती.
ही बोट नेमकी कशी या ठिकाणी धडकली किंवा पोहोचली याचा नौदल अधिकारी व मुंबई पोलीस समन्वयाने शोध घेत असून याबाबत लवकरच मुंबई पोलीस अधिकारी यांचा खुलासा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र ही बोट थेट गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आल्याने सागरी सुरक्षेचे पुन्हा एकदा वाभाडे निघालेले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.