मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात रात्री दुकानांची तोडफोड, गाड्यांची जाळपोळ, गावात मोठा तणाव

जळगाव दिनांक-३१/१२/२४, जळगाव तालुक्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन वाहनांमध्ये कट लागल्याने गावातील दोन गटात बाचाबाची झाली. थोड्याच वेळात या वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. या दंगलीनंतर काही जणांनी टिव्ही, मोबाईलच्या पाच दुकानांची जाळपोळ केली. तीन चारचाकी गाड्या पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. या वादामुळे पाळधीत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ४ संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाळधी गावातील मुख्य रस्त्यावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका राजकीय नेत्याच्या गाडीचा दुसऱ्या गाडीला कट लागल्याने वाद झाला. वाहनचालकांच्या वादानंतर हे प्रकरण तेथेच मिटले होते. परंतु थोड्याच वेळात दोन्ही गटातील लोक ग्रामपंचायत चौकात समोरासमोर आल्याने पुन्हा वाद उफाळला. यानंतर
झालेल्या हाणामारीत दंगल पसरली. एका गटाने परिसरातील पाच दुकानांची जाळपोळ केली. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांचे पथक पाळधीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पथकाने या परिसरामध्ये गस्त कायम ठेवली होती. दरम्यान थर्टी फस्ट असल्यामुळे पाळधीसह परिसरात जळगावकरांनी पार्टीसाठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला. महामार्गावरील सर्व हॉटेल्स पोलिसांनी तात्काळ बंद केल्या. रात्री उशिरापर्यंत दंगा नियंत्रण पत्रकासह पोलिस कर्मचारी गस्त करीत होते.