कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या ‘जप्ती’ची नामुष्की

जळगाव ,दिनांक-३१/१२/२४, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ च्या कार्यालयातून जवळपास वीसच्या वर खुर्च्या आणि एक संगणक संच आयशर क्र- MH-04 EL1894 या गाडीत आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या भरून नेल्याने एकच खळबळ उडालेली आहे. यामुळे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक २ जळगाव ची मोठी नाचक्की झालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २, च्या कार्यालयातून जवळपास वीसच्या वर खुर्च्या व एक संगणक संच आयसर गाडीत भरून जप्त करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, सदरील खुर्च्या जप्त करणाऱ्या व्यक्तींना विचारपूस केली असता, त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. याचवेळी कार्यालयात उपस्थित असलेले कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनाही सदर जप्तीच्याबाबत उपस्थित पत्रकारांनी विचारपूस केली असता, त्यांनी कोणतीही माहिती न देता, याबाबत मौन बाळगलेले आहे. त्यामुळे सदरील खुर्च्या व संगणक संच हे नेमके कोणत्या कारणास्तव जप्त करण्यात आलेले आहेत ? की, कुठे दुसरीकडे नेण्यात आलेले आहेत ? की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दिवसाढवळ्या झालेली ही ‘घरफोडी’ म्हणावी ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सदरील झालेल्या प्रकाराबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे या खुर्च्या गाडीत भरून लंपास करण्याच्या प्रकरणाचे गूढ वाढलेले आहे.