मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती रिमोट
मुंबई : दि-२०,दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं बदल्यांच्या मुद्यावर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची बदली करण्यात आली होती. त्यांना निवडणूक आयोगानं पदावरुन हटवलं होतं. निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र सरकारनं इकबाल चहल, आश्विनी भिडे आणि पी. वेलारुसू यांची बदली करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. अखेर आयोगानंच बदल्या केल्या होत्या. निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबई तसेच उपनगरांत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव असलेले भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेत आयुक्तपदी बसविल्याची चर्चा सुरू आहे. तर ठाणे महापालिकेचे आयुक्तपद सौरभ राव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यासह कैलाश शिंदे यांच्यावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबबादारी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगानं महाराष्ट्र सरकारला ज्या अधिकाऱ्यांनी एखाद्या नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम केलं असेल, त्यांची बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश असूनही महाराष्ट्र सरकारनं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नव्हत्या. महाराष्ट्रासह देशभरात जवळपास अशीच स्थिती होती.