राष्ट्रवादीचे अजित पवार मुख्यमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस बोलले की…
मुंबई दि-24 राष्ट्रवादीचे मंत्री अनील पाटील यांनी खूप मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असल्याचं ना.अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.मात्र त्यासाठी 145 चे संख्याबळ असणे आवश्यक आहे.त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाबाबत एकच चर्चा सुरु झाली. या सर्व चर्चांवर आता अखेर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांनाही वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस पुढं म्हणाले की,आमच्या पक्षातील लोकांनाही वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांनी आधीच स्विकारलेय !
तसेच या संदर्भात अजित पवार आणि मी, आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची पूर्ण चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारलीही आहे. केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही”, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले.