महाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

‘लाडकी बहिण’ ची रक्कम 3000 होणार,घरगुती वीजग्राहकांना शून्य वीजबिल तर शेतकऱ्यांना मोफत – CM एकनाथ शिंदे

सातारा दि.18/08/2024:   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम 3000 रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीणींना दिली आहे. राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीजबिल देखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिली.
       पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने 100 टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौरग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच  रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मान्याचीवाडीचे सरपंच  रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प)  प्रसाद रेशमे प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या दीड वर्षांमध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे 12 हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही. राज्याने सौर ऊर्जेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून मान्याचीवाडीचे आज लोकार्पण झाले याचा आनंद आहे. या गावात पूर्वी 5 लाख 25 हजार रुपयांचे वीजबिल येत होते. ते सौर ग्राममुळे शून्य झाले आहे. आता राज्यातील 100 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यासाठी गावांची निवड झाल्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे,  महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे, मुख्य अभियंता  अंकुश नाळे यांची उपस्थिती होती.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button