शेतकऱ्यांसाठी भर आमसभेत आ. मंगेशदादा चव्हाण यांनी थेट मंत्री अनिल पाटलांना केला फोन, 25 कोटी मंजूर
चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा आमसभेत वरचष्मा
चाळीसगाव :दिनांक 18 सप्टेंबर- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज तब्बल बारा वर्षानंतर आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्षस्थान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भूषविले. या प्रसंगी तालुक्यातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती.
उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची वादळी आमसभा होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले.
तसेच या आमसभेत नागरिकांनी आपल्या समस्या देखील तितक्याच बेधडकपणे मांडल्या होत्या आणि त्या समस्यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तात्काळ निरासन करत नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे. तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन कृषी विभाग वन विभाग महावितरण विभाग यासह सर्वच प्रमुख शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी अवैध धंदे, तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांची कामे वेळेवर न करणाऱ्या तसेच नागरिकांकडून कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व कामचुकार अधिकाऱ्यांची आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चांगलीच झाडाझडती घेऊन कामात सुसूत्रता आणून नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश या आमसभेत दिलेले आहेत. यात चक्क गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांनाही नागरिकांनी या ठिकाणी वाचा फोडली.यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आठ ते दहा वर्षांपासून वारंवार आलेल्या महापुरामुळे वाहून गेलेली शेतजमीन ,पिकांचे झालेले नुकसान, रस्त्यांसाठी झालेलं भूसंपादन आणि त्याचा न मोबदला, तसेच वनविभागाने त्यांच्या हद्दीत येणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर भा.दं.सं. कलम 1962 च्या अनुषंगाने लावलेला ‘वनविभाग’ असा उल्लेख यासंबंधीच्या वादांवर या ठिकाणी गंभीर चर्चा होऊन या विषयावर मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच काही जटील व गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यानुसार समस्या निर्मूलन करण्यासाठी या आमसभेत एकमताने ठराव करण्यात आलेले आहेत.
मंत्री अनिल पाटील यांना आमसभेतूनच लावला फोन
2017 साली चाळीसगाव तालुक्यात आलेल्या महापुरामुळे काही शेतकऱ्यांच्या नदीकाठी असलेल्या शेतजमिनी वाहून गेलेल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना आज पावतो वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही नुकसान भरपाई किंवा अन्य मोबदला मिळाला नव्हता या संदर्भात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याशी भर आमसभेत मोबाईलवर संपर्क करून या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या सीमेवर पूर संरक्षण भिंती बांधण्यासाठी व इतर नुकसान भरपाई साठी २५ कोटी ७४ लाख २२ हजार रूपयांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी यांच्या दालनात आणि मंत्रालयात एक बैठक घेऊन या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला व इतर संरक्षक भिंतीची कामं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.