सर्वाधिक १३ जागा जिंकत काँग्रेसला आले ‘अच्छे दिन’,१७ सभा मोदींच्या दोनच उमेदवार विजयी, स्मिता वाघ यांना केंद्रात मंत्रीपद ?
महाराष्ट्रात मोदी लाट ओसरली ?
मुंबई, दि. ५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडलेली आहे.
काँग्रेसची जोरदार मुसंडी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यात मोठी मुसंडी मारलेली असून तब्बल 13 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा कमबॅक केलेला आहे. राहुल गांधींनी ज्या ठिकाणी भारत जोडो यात्रा केलेल्या होत्या त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आलेले आहेत.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या 17 मतदारसंघात नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या होत्या ,त्यापैकी फक्त कल्याण मतदारसंघाचे श्रीकांत शिंदे आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या या फक्त दोनच जागा महायुतीला जिंकता आलेल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातून मोदी लाट ओसरल्याची ही चिन्हे दिसत आहे.
गिरीश महाजनांना मोठा धक्का
दरम्यान, दुसरीकडे भाजपचे बालेकिल्ले असलेले नगर, शिर्डी, धुळे ,नंदुरबार, नाशिक, दिंडोरी ,जालना आणि बीड या जागांवर भाजपचा दारूण पराभव होऊन पानिपत झालेलं आहे. यातील बहुतांश जागा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी मावळत्या सरकारमध्ये धुळ्यातून सुभाष भामरे , नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघाच्या भारती पवार आणि जालन्यातून रावसाहेब दानवे हे केंद्रात राज्यमंत्री होते. या सर्वांचा आता दारुण पराभव झालेला आहे. स्मिता वाघ यांना केंद्रात मंत्रीपद ? महायुतीने देशात सर्वाधिक जागा जिंकल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. जर पुन्हा एकदा केंद्रात महायुतीच्या नेतृत्वाखाली म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यास त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या स्मिता वाघ यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राज्यात या क्षणी तीन विद्यमान केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झालेला आहे.तसेच त्या मंत्री गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. त्यांना लोकसभेचे तिकीट मिळवून देण्यात आणि विजयी करण्यात गिरीश महाजन यांचा मोठा वाटा असल्याचे सर्वश्रुत आहे.तर दुसरीकडे रावेरच्या खासदार रक्षा खडसे या सुद्धा सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत.मात्र त्यांचे सासरे आ.एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी राजकीय वैर असल्याने रक्षा खडसेंना मंत्रिपद दिल्यास गिरीश महाजनांच्या जिल्ह्यासह भाजपमधील वर्चस्वाला धक्का बसू शकतो. यामुळे भाजपमध्ये उभी फूट पडून दोन गट पडू शकतात. रक्षा खडसेंना मिळालेले मंत्रीपद म्हणजे अप्रत्यक्षपणे एकनाथराव खडसेंना मिळालेले मंत्रीपद राहील, हे सर्वश्रूत आहे. म्हणून रक्षा खडसेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे.