अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट गुवाहाटीला जाणार ?अजित पवारांची वाटचाल आता हिंदुत्वाकडे जाणार ?
मंत्री चंद्रकांत पाटलांचे पुण्याचे पालकमंत्री पद जाणार ?
मुंबई दि-13 मागील वर्षी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार फुटून ते गुवाहाटीच्या हॉटेलात गेले होते अगदी त्याच पद्धतीचा प्रकार आता पुन्हा एकदा महाराष्ट्र देशाला दिसण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यावेळी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा “काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल”हा डायलॉग खूप मनोरंजकपणे चर्चेचा विषय झालेला होता.
कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार ?
मागील वर्षी सत्तांतरासाठी शिवसेनेचे 45 नाराज आमदार फुटून गुवाहाटीला गेले होते. मात्र यावेळी तोच कित्ता गिरवत गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार गुवाहाटीच्या मंदिरात जाणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. त्याला कारणही तसेच असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुरू झालेल्या नवीन सत्ताकारणाच्या गुंतागुंतीच्या समीकरणामुळे मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटपाचा आव्हानात्मक पेच निर्माण झालेला आहे.अगदी दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्यानंतर सुद्धा हा पेच सुटत नसल्याने यावर उपाययोजना म्हणून काहींनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले तर लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन इच्छुकांना मंत्रिपदे मिळू शकतील अशी धारणा आता राष्ट्रवादीच्या काही इच्छुक आमदारांमध्ये आज चर्चेचा विषय झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवारांची वाटचाल पुरोगामीत्वाकडून हिंदुत्वाकडे जाणार का ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यांवर विश्वास ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करून राज्यातील सत्तेत सहभागी झाले आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बहुतेक घटक पक्ष हिंदुत्ववादी विचारधाराने प्रेरीत आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट आता या आघाडीत सामील झाल्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादीची परंपरागत पुरोगामी विचारधारा सोडून हिंदुत्वाकडे वळतील का ? अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.असे झाल्यास त्याचे पहिले पाऊल म्हणजे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाण्याची योजना आता चर्चेचा विषय बनलेली आहे.यावरून आता खलबतं सुरू झालेली असून याचा अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती असल्याची चर्चा आहे.
काही आमदारांची सूचक प्रतिक्रिया
याबाबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांशी गुवाहाटीच्या पर्यटनाबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता,एकाने ‘थोडं थांबा’ तर एकाने दर्शनासाठी गेल्यास मंत्रीमंडळाच्या विस्तारातील ‘बाधा’ लवकरच दूर होऊ शकते ,असे सांगितले. मात्र नेमकी कोणती ‘बाधा’ आड येतेयं हे मात्र गुलदस्त्यात आहे.तर एकाने गुवाहाटी आणि अयोध्या दोन्ही ठिकाणी याच वर्षी जाऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटलांचे पुण्याचे पालकमंत्री पद जाणार ?
सध्याचा मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थ,जलसंपदा,ग्रामविकास खाते आणि अजित दादांना पुण्याचे पालकमंत्रीपद या विषयांवरून रखडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास मंत्री चंद्रकांत पाटील तयार नसल्याची चर्चा आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजित पवारांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला आहे.कारण काही महिन्यांपूर्वी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजप उमेदवाराचा झालेला धक्कादायक पराभव हा भाजपसाठी मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. पुण्यात पूर्वी पासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये कट्टर राजकीय वैर आहे.आणी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आता कोणताही धोका पत्करण्याची भाजपची इच्छा नसल्यानं हे ही मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याच प्रमुख कारण आता समोर आले आहे.