अमित शाहांनी जळगावात भाकरी फिरवली ! ‘यांची’ नाव लोकसभेसाठी सर्वात आघाडीवर, मुंबईत संभाव्य यादी फायनल
संभाव्य यादीतून खा.रक्षा खडसेंचे नाव गायब?
जळगाव दि-5 मार्च, आज जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा क्षेत्राच्या हायटेक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार , रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे मोजकेच महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जवळपास 25 मिनिटे झालेल्या या चर्चेत जळगाव, रावेर ,धुळे ,नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती, विद्यमान खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ आणि लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची माहिती याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली होती. या गुप्त बैठकीत झालेल्या चर्चेनंतर धक्कादायक माहिती समोर आलेली असून रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसेंचे नाव पिछाडीवर पडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. तर माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल हरिभाऊ जावळे यांचे नाव रावेर लोकसभेसाठी सर्वात आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. तर जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार उन्मेश पाटील आणि माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याची माहिती समोर आलेली आहे.