जळगाव – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले आमदार एकनाथ खडसे यांनी आज ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केलेला आहे.
त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता की, अजूनही आपला भाजप प्रवेश का रखडलायं ? यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की, पक्षातील काही लोकांचा माझ्या प्रवेशाला सध्या विरोध असल्याने, लोकसभा निवडणुकीनंतर माझा भाजप प्रवेश हा निश्चित होणार असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश चर्चेत आलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या एकनाथराव खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात ‘राहू-केतू ‘ चा अडथळा असल्याने प्रवेशाचा मुहूर्त रखडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला राज्यातून कोणाचाच विरोध नसल्याचे दोन दिवसांपूर्वी सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मात्र आज एकनाथराव खडसेंनी कोणाचा तरी सध्या विरोध असल्याचे कबूल केले असल्याने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा तर विरोध नाही ना ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजप प्रवेश झालेला नसला तरीही मात्र भाजपच्या उमेदवार स्नुषा रक्षा खडसे यांचा एकनाथराव खडसेंनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांशी संवाद साधून पडद्यामागून जोरदार प्रचार सुरू केलेला आहे.
आ.चंद्रकांत पाटील शरद पवारांचे ऋण फेडतील – रोहीणी खडसे
आज ‘मुंबई तक’ ला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी खडसे यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील सक्रिय सहभागी झाले नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता,त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे की, गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आणी त्यासाठी शरद पवार साहेबांनी त्यांना पुरस्कृत करून संपूर्ण पाठिंबा दिला होता. म्हणून ते विजयी झाले होते. माणसाला आयुष्यात कधीना कधी ऋण मुक्त व्हावेच लागते. आज शरद पवार अडचणीत असताना त्यांच्या उमेदवाराला सहकार्य करून आमदार चंद्रकांत पाटील यांना ऋण मुक्त होण्याची चांगली संधी नक्कीच आलेली आहे. पण ते काय निर्णय घेतात हे सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे.
‘लीड ‘ठरविणार विधानसभेची रंगीत तालीम ?
येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत राहणार असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज राजकारणाची रंगीत तालीम या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भाजपच्या उमेदवार यापैकी कोणत्या उमेदवाराला जास्त मताधिक्य मिळतं हे निर्णायक ठरणार असून यावरून विधानसभेची समीकरणे बांधली जाणार आहे.
जर भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य जास्त मिळालं तर ‘जायंट किलर’ अशी ओळख मिळालेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या धर्माचे पालन करून मताधिक्य मिळवून दिले, म्हणून महायुतीतून ते उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून नक्कीच दावा ठोकतील. आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला जास्त मताधिक्य मिळाले तर रोहिणी खडसेंनी मताधिक्य मिळवून दिले असा त्याचा अर्थ होईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यास गेले तीस वर्ष एकनाथराव खडसेंना निवडून देणाऱ्या मुक्ताईनगरात एकनाथराव खडसेंची मतदारसंघावरची पकड निसटल्याचे म्हटले जाईल. तसेच याच विषयात त्यांच्या स्नुषा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना मताधिक्य कमी मिळाल्यास त्यांच्या विरोधात ॲन्टी इन्कमबन्सी असल्याचे दिसून येईल. म्हणजेच दोन्ही बाजूंनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खडसे कुटुंबांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागल्याचे दिसून येत आहे.