केळी महामंडळ अजूनही स्थापन नसल्याने शेतकऱ्यांसाठी निधी वापरता येणार नाही – आ.संजय सावकारे
मुंबई दि-25 काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर केळी महामंडळ स्थापन करून त्यासाठी 100 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली होती, मात्र अजूनही केळी महामंडळ स्थापन झाले नसल्याने तो निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करण्यात येणार नसल्याचा औचित्याचा मुद्दा आज विधानसभेत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी उपस्थित केला.
यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे निवेदन
राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच लवकरच याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन सादर केले आहे.