Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

जळगाव जिल्हा पोलीस दलात नवीन अधिकारी येण्याची शक्यता; भुसावळात आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीची शक्यता

प्रशासकीय बदल्यांकडे पोलिसांचे लक्ष

जळगाव : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी, सलग खूनांच्या घटना, ड्रग्स प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांचा संशयास्पद सहभाग आणि अलीकडील बोगस कॉल सेंटर प्रकरणानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय नियमानुसार बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात नवीन अधिकाऱ्यांचे आगमन होण्याची शक्यता वाढली असून, संपूर्ण पोलिस यंत्रणेचे लक्ष याकडे केंद्रित झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ शहरात देखील गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी येथे सहा महिन्यांसाठी एका परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. पोलिस दलात होणारे हे फेरबदल जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे मानले जात आहे.

वाढती गुन्हेगारी आणि खूनांच्या घटना

गेल्या काही महिन्यांत जळगाव शहरासह ग्रामीण भागात किरकोळ कारणांवरून हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. अनेक खून प्रकरणांत आरोपी हे प्रथमच गुन्हे करणारे किंवा अल्पवयीन असल्याचे दिसून आले आहे. गतकाळातील काही गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस दलासमोर गुन्हेगारी थोपविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ड्रग्स आणि बोगस कॉल सेंटर प्रकरण

गेल्या वर्षी जळगाव शहरातील शाहू नगर ड्रग्स प्रकरण खूप गाजले होते, ज्यात पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या चर्चेने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. तसेच, अलीकडेच ममुराबाद जवळ जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकून मोठ्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या ठिकाणी अनेक लॅपटॉप जप्त करण्यात आले. मात्र, सीबीआयची धाड पडण्याआधीच पोलिसांची कारवाई झाल्याची चर्चा काही दिवस सुरू होती.

या सर्व घटनांचा वाढता प्रभाव पाहता, पोलीस दलात खांदेपालट करणे आवश्यक झाले आहे. सूत्रांच्या मते, हे बदल येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने गुन्हेगारी नियंत्रण, ड्रग्स तस्करी रोखणे आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हावासीयांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी हे बदल फायदेशीर ठरतील, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. अधिकृत आदेश येताच याबाबत स्पष्टता येईल.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button