भुसावळातील ‘आशा कंस्ट्रक्शन’ ला अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी 2 लाख 39 हजारांचा दंड,तात्काळ वसुलही
विमा व परमीट नसलेल्या वाहनांमधून गौण खनिजांची अवैध वाहतूक

भुसावळ, दि:-11/02/2026 , भुसावळ महसूल विभागाच्या पथकाने मौजे किन्ही येथील MIDC (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसरात अवैध गौण खनिज (डबर/मुरुम) वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. आशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या MH-19-CY-0438 क्रमांकाच्या डंपरने गौण खनिज (डबर) वाहतूक करताना तो महसूल पथकाच्या निदर्शनास आला. या वाहनाकडे गौण खनिज वाहतूक परवाना (Permit) नसल्याने त्यास जप्त करण्यात आले असून, भुसावळ तहसील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.
तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सदर डंपर अवैधरित्या डबर वाहतूक करत असताना पथकाने त्यावर कारवाई केली आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेले असून, अशा प्रकरणांमध्ये कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचे धोरण सातत्याने अवलंबले जात आहे.
या धडक कारवाईमुळे आतापर्यंत या अवैध वाहतूकीकडे हेतूपूर्वक कानाडोळा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
या कारवाईत एकूण रुपये २,३९,२३० (दोन लाख एकोणतीस हजार दोनशे तीस) इतका दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन मालकाला हा दंड भरण्याची सक्ती करण्यात आली असून, भविष्यात अशा अवैध वाहतुकीबाबत कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी, पिंपळगाव – श्रीमती वैशाली पाटील प्रमोद ठोसर, तलाठी किन्ही ,कोमल भुजाडे, तलाठी खडका ,तलाठी, पिंपळगाव बुद्रुक ,मिलिंद तायडे, तलाठी पिंपळगाव खुर्द ,सुनील कचगुंडे ,हे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
महसूल विभागाच्या आता सातत्याने होणाऱ्या या संयुक्त कारवाईमुळे स्थानिक स्तरावर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर अंकुश बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांबाबत नागरिकांनीही प्रशासनाला कळवावे, असे आवाहन तहसीलदार नीता लबडे यांनी केले आहे.













