जळगाव जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षक-कर्मचाऱ्यांवर तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार कठोर कारवाई होणार ?
अनेकांवर कारवाईची टांगती तलवार ?

जळगाव, दि. ५ डिसेंबर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे मुख्य सचिव तथा प्रसिद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या थेट सूचना व आदेशानुसार बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईचे आदेश बजावले आहेत. येत्या दोन दिवसांतच अशा बोगस लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची मोघम चर्चा जिल्हा प्रशासनात रंगली आहे.
दरम्यान , सचिव श्री. तुकाराम मुंढे यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद प्रशासनाला “कोणत्याही परिस्थितीत बोगस दिव्यांग लाभार्थ्यांना पाठीशी घालू नये, त्यांच्या प्रमाणपत्रासह शारिरीक दिव्यांगाची नवीन शासकीय डॉक्टरांकडून सखोल तपासणी व चौकशी करून त्यांना निलंबित करून व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा”असे स्पष्ट आदेश दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आदींत गेल्या अनेक वर्षांत ४० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व दाखवून आरक्षणाचा लाभ घेतलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांची पुनर्तपासणी सुरू झाली आहे. यात विशेषतः अंधत्व व कर्णबधिरत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांवर नोकरी मिळालेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे.
तपासणीसाठी हजर न झाल्यास थेट गुन्हा
पुनर्तपासणीसाठी नोटीस बजावूनही जे कर्मचारी जिल्हा वैद्यकीय रूग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर हजर झालेले नाहीत, अशांवर कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच अशा कर्मचाऱ्यांची नोकरी तात्काळ संपुष्टात आणली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“ सचिव तुकाराम मुंढेचा थेट आदेशानुसार यावेळी कोणीही वाचणार नाही. अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक असले तरी कारवाई होणार,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व इतर विभागांमध्ये गेल्या १५-२० वर्षांत बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे मिळालेल्या नोकर्या आता धोक्यात आल्या असून, येत्या काही आठवड्यांत मोठ्या प्रमाणात निलंबने व बडतर्फच्या बातम्या समोर येण्याची शक्यता आहे.यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सेवेत रूजू असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जारी करणाऱ्या डॉक्टरांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.













