तब्बल 8 गावठी पिस्तुल जप्त, जळगाव जिल्हा पेठ पोलिसांची जिल्हाभरात मोठी कारवाई,7 जणांना अटक

जळगाव – जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत ८ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली असून, काही आरोपींचा पूर्वीपासून गुन्हेगारी इतिहास असल्याचेही तपासात समोर आले आहे.
जिल्हापेठ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही व्यक्ती अवैध गावठी पिस्टली बाळगून त्यांची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नडवणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई सुरू केली.
तपासादरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम जळगाव येथील भज्जी गल्ली परिसरातून यश रामदास नन्नवरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने ही पिस्टल केशव सुनील भालेराव याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी केशव भालेराव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अवैध शस्त्रांचा पुरवठा समाधान बळीराम निकम हा करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समाधान निकम याचा शोध घेत त्याला जामनेर तालुक्यातील नेरी परिसरातून अटक केली.
पोलिस चौकशीत समाधान निकम याने मध्यप्रदेशातून गावठी पिस्टली आणून विविध व्यक्तींना विक्री केल्याची कबुली दिली. त्याने केशव भालेराव, यश नन्नवरे, गौरव देविदास साळवे, विकास प्रकाश काकडे तसेच इतर काही व्यक्तींना गावठी पिस्टली विकल्याचे उघड झाले.
या प्रकरणात पोलिसांनी गौरव देविदास साळवे यालाही अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ८ गावठी पिस्टली व १० जिवंत काडतुसे जप्त केली असून, या अवैध शस्त्रांच्या तस्करीत सहभागी असलेल्या एकूण ७ आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान अटक केलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपी समाधान बळीराम निकम हा पाचोरा पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असून, यावल पोलीस ठाण्यातील आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तसेच केशव सुनील भालेराव हाही वरणगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यावर मोठा आघात मानली जात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपी किंवा शस्त्र पुरवठादारांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
या कारवाईत जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकातील गोपाल वेशमुख, महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे, नरेंद्र दिवेकर आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.














