
जळगाव दि-22/02/25 तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यात वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 आणि 2 सध्या प्रगतीपथावर आहेत. या योजनांच्या माध्यमातून एकूण 19,132 हेक्टर शेती क्षेत्राला लाभ मिळणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून ही योजना कार्यान्वित होणार आहे. यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
वाघुर उपसा सिंचन योजना क्रं. -1 अंतर्गत जामनेर तालुक्यातील 27 लाभधारक गावातील सरपंच आणि शेतकरी याच्या बरोबर नियोजन भवन सभागृहात येथे बैठक ठेवण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता, श्री. यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता वाघूर धरण विभाग गोकुळ महाजन,कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जिल्ह्याचे बँक अग्रणी व्यवस्थापक प्रणवकुमार झा, जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग जळगाव श्री अतुल पाटील हे उपस्थित होते.
वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1
या योजनेअंतर्गत गाडेगाव, जामनेर आणि गारखेडा या तीन शाखांमधून 10,100 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले जाणार आहे. सदर योजनेंतर्गत लाभक्षेत्रीतील 27 गावांमध्ये 2020 शेततळे तयार करण्याचे नियोजन असुन त्यापैकी 210 शेततळ्यांची कामे पुर्ण झालेली आहेत. पुर्ण झालेल्या शेततळ्यापैकी गाडेगाव शाखेवरील गाडेगाव, नेरी बु, नेरी दिगर, चिंचखेडा, करमाड व पळासखेडा शिवारातील 70 शेततळ्यांध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात झालेली आहे. योजना कार्यान्वित करण्यासाठी पंपाद्वारे पाणी उचलून उच्चस्तरीय जलकुंभांमध्ये पाठवले जाते व त्यानंतर गुरुत्वीय प्रवाहाने शेततळ्यांपर्यंत पाणी पोहोचवले जाते. सध्या 90% पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.
वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 2
या योजनेत ओझर, गोंडखेल, सितखेडा आणि पळासखेडा या चार शाखांचा समावेश आहे. सदर योजनेंतर्गत वाघुर उपसा सिंचन योजना क्रं. 1 अंतर्गत अंशत: आलेली 12 गावे व नव्याने 19 गावांचा समावेश आहे. सदर गावांमध्ये 1810 शेततळे तयार करण्याचे नियोजन आहे. सदर योजनेच्या संकल्पनास मान्यता विषयक कार्यवाही पुर्ण झालेली असुन प्रत्यक्षात कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 2 9,032 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पाण्याचा पुरवठा दाबयुक्त वितरण प्रणालीद्वारे केला जाणार आहे.
शेततळ्यांचा फायदा
या योजनेत शेतकऱ्यांसाठी शेततळ्यांची संकल्पना राबवण्यात आली आहे. याद्वारे जामनेर तालुक्यातील 46 गावातील 19132 हेक्टर लाभक्षेत्रात एकूण 3,831 शेततळे प्रस्तावित असून आतापर्यंत 1,189 शेततळ्यांचे करारनामे केलेले असुन 210 शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. शेततळ्यामुळे पाण्याचा साठा करता येणार असून, त्याभोवती फळझाडांची लागवड आणि मत्स्यव्यवसायालाही चालना मिळणार आहे.
यावेळी मत्स्य व्यवसायातील बारकावे याचेही बारकावे सांगण्यात आले. मत्स्य बिजा पासून ते त्याचे खाद्य ते मार्केट पर्यंतची माहिती देण्यात आली.जिल्ह्याचे बँक अग्रणी व्यवस्थापक प्रणवकुमार झा यांनीही यावेळी आपण प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सगळे पाहिल्याचे सांगून विविध बँकांच्या पतपुरवठ्या बाबत काही अडचण असल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क करावा असे सांगून सर्वांना आपला संपर्क क्रमांक सांगितला.
जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन
वाघूर उपसा सिंचन योजना ही जळगाव जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरत आहे. पाणी नियोजन योग्य प्रकारे केल्यास अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि शेती उत्पादनवाढीला चालना मिळेल. त्याचा फायदा या 27 गावातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आले आहे.