तोतया ACB अधिकाऱ्यांनी PWD अधिकाऱ्याच्या घरी सिनेस्टाईल धाड टाकून 36 लाख लुटले
नवी मुंबई दि:29 एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी दरोड्याची थरारक घटना नवी मुंबईत उघडकीस आलेली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB)अधिकारी असल्याची बतावणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD)च्या निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून 36 लाखांचा चुना लावल्याची घटना नवी मुंबईतील ऐरोलीत उघडकीस आली आहे. सहा जणांच्या टोळीने घराची झडती घेत मुद्देमाल मोठ्या शिताफीने लंपास केला. कांतिलाल यादव असे लुटण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील ऐरोली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीपासून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
विना ओळखपत्राचे अधिकारी
कांतिलाल यादव या निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी 21 जुलै रोजी सहा जण गेले. त्यांनी आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी (ACB) असल्याची बतावणी केली. मग त्यांच्याविरोधात तक्रार आली असून घराची झडती घेण्यास आल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने यादव आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आणि घराची झडती पूर्ण होईपर्यंत आपल्या जवळ बसण्यास सांगितले. यानंतर यादव यांच्या पत्नीकडून तिजोरीच्या चाव्या काढून घेतल्या. यादव यांनी एका आरोपीला त्याचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मात्र आरोपीने झडती पूर्ण झाल्यावर ओळखपत्र दाखवतो असे सांगितले.
तीन कपाटाच्या तिजोरी फोडल्या
यानंतर सर्वांनी आपला मोर्चा बेडरूम कडे वळवून तीन बेडरूममधील तीन कपाटांच्या तिजोऱ्यांची झडती घेतली. तिन्ही तिजोरीत मिळून 25 लाख रुपये रोकड, 3.80 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, अंगठी आणि एक ब्रेसलेट असा एकूण 4.20 लाख रुपयांचा ऐवज, तसेच 40,000 रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, 80,000 रुपये किमतीचे हिरेजडीत सोन्याचे मंगळसूत्र आणि 10,000 रुपये किमतीची दोन घड्याळे जप्त केली. शिवाय कपाटातील मौल्यवान वस्तू लेदरच्या पिशवीत भरून आरोपी पसार झाले. घटनेच्या तिसऱ्या दिवशी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यादव यांच्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.