तोतया IPS अधिकाऱ्याने खऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा, खाकी वर्दी, लोगो, बॅच,सायरनसह अनेक वस्तू जप्त
एकाही अधिकाऱ्याने केली नाही याची तक्रार
नाशिक,दि-14/10/2024, भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि महसूलसह वन विभागाच्या शासकीय गणवेशाच्या साहित्यासह गणवेश बाळगणाऱ्या तोतया ‘आयपीएस’ला नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. गौरव रामाअछेबर मिश्रा (वय ३४ ) रा.हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असणारे हुबेहूब अस्सल खाकी वर्दीसह, वाँकी टॉकी, लोगो, बॅचसह महागडे मोबाइल व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून इंदिरानगर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्या घराची झडती घेतली असता चाळीसगाव येथील स्वर्गीय पुडंलिक सगळे चॅरिटेबल ट्रस्टचे लेटरहेड असलेली ४७ पाने, जळगाव येथील धर्मदाय सहायक आयुक्तांच्या कार्यालयाने दिलेले नोंदणीचे प्रमाणपत्र, परवाने, कराराची कागदपत्रे संशयित मिश्राकडून पोलिसांनी जप्त केली.
दरम्यान,गुन्हे शाखा युनिट दोनचे अंमलदार संजय सानप यांनी इंदिरानगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मिश्राविरुद्ध तोतयागिरीचा गुन्हा नोंद आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार पथकाने संशयिताच्या घरून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने शासकीय गणवेश परिधान केला नव्हता. या कारवाईचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. दरम्यान, संशयित वाणिज्य शाखेचा पदवीधर असून विवाहित आहे. आईवडिलांसह तो पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास आहे. त्याने शासकीय वर्दी आणि कागदपत्रे घरी का ठेवली, गणवेश परिधान करून कोणाला फसवले, गणवेश खरेदी करण्याचा उद्देश काय, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक भूषण सोनार यांनी सांगितले.
अनेक IPS अधिकाऱ्यांना लावला कोट्यावधींचा चुना
अटक करण्यात आलेल्या गौरव मिश्राने प्राथमिक तपासात काही धक्कादायक बाबींचा उलगडा केला असून त्याने चक्क आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्यांची बदली करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे त्याने मोक्याच्या ठिकाणी बदली करीता ‘फिल्डिंग’ लावण्यासाठी इच्छुक असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना तो आयपीएस असल्याचे भासवून मध्यस्थ म्हणून मुंबईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संगनमत करून बोलणं करून देऊन विश्वासात घेऊन कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आलेली आहे. यातून त्याने महागड्या आलिशान गाड्या, मुंबई, पुण्यात फ्लॅट्स विकत घेतलेले असून त्याच्या संपत्तीची चौकशी आता सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या एकाही पोलीस अधिकाऱ्याला तो तोतया अधिकारी असल्याचे त्याने जाणवू दिले नसल्यामुळे त्याच्याबाबत कोणीही तक्रार केलेली दिसून येत नाही. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती घेणे सुरू असून यातून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
मिश्राच्या घरझडतीतून जप्त…
🛑 ‘सॅमसंग एस २२ अल्ट्रा’ हा ८० हजारांचा मोबाइल
🛑 ‘आयफोन १५ प्रो’ हा १ लाख १० हजारांचा मोबाइल
🛑 ४० हजार रुपयांचा लॅपटॉप
🛑 ‘ACP’ दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश, खाकी वर्दीवर तीन पंचकोनी स्टार
🛑 रेव्हेन्यू अधिकाऱ्याचा गणवेश, धातूचे लोगो, चामडी बेल्ट
🛑 ‘आयपीएस’व ‘मपोसे’ची शासकीय टोपी आणि खांद्यावरील बॅच
🛑 पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशासोबतची तलवार
🛑 वन विभागाच्या अधिकाऱ्यांची शासकीय टोपी
🛑 महाराष्ट्र पोलिसचा लोगो असलेले दोन चिनी मातीचे कप
🛑 लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचा (एबीएसएनएए) लोगो असलेला एक कप
🛑 पोलिसांच्या शासकीय वाहनांवरील अंबर व लाल निळे दिवे, सायरन
🛑 बंद अवस्थेतील दोन वॉकी-टॉकी (वायरलेस सेट). 🛑 दोन मोठ्या आलिशान गाड्या