दिपनगर प्रकल्पाचे मुख्य अभियंता राखेमध्ये भ्रष्टाचार करताहेत !! त्यांची लवकरच बैठक लावून दोषी आढळल्यास कारवाई करू- पालकमंत्री गुलाबराव पाटील
मुख्य अभियंत्यांनी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा संशय

जळगाव दि- ०५/०४/२०२५, दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची प्रकरणे कानावर आलेली असून राखेची विक्री व वाहतुकीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. या ठिकाणीही काही राखमाफिया निर्माण झालेले असून त्यावर आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहोत. हवेतून पसरणाऱ्या राखेमुळे आणि धुलीकणांमुळे भुसावळ तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच अनेक जणांना श्वसनाचे, फुफ्फुसाचे , हृदयविकाराचे आणि डोळ्यांचे आजार सुरू झालेले असून आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात दीपनगर निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांची बैठक घेऊन भुसावळ परिघात वाढलेल्या प्रदूषणाबाबत त्यांना जाब विचारला जाणार आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिलेली आहे.
दिपनगर प्रकल्प बंद का करू नये ? प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय अधिकाऱ्यांनी बजावली “अनुपालन आदेशाची ” नोटीस https://mediamail.in/दिपनगर-प्रकल्प-बंद-का-करू/
काही दिवसांपूर्वीच मीडियामेल न्युजने या प्रकल्पाच्या चिमण्यांमधून मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होणाऱ्या विविध प्रकारच्या विषारी वायु प्रदूषकांमुळे, राखेमुळे , आणि धुलीकणांमुळे भुसावळ परिसरातील प्रदूषणाची पातळी ही 172 पर्यंत अत्यंत धोकादायक पातळीवर गेल्याने नागरिकांच्या जीवाला विविध प्रकारचे आजार जडण्याचा धोका निर्माण झालेला असल्याची बातमी प्रकाशित केलेली होती. ही बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना टॅग देण्यात आलेली होती.
दिपनगर वीजनिर्मिती केंद्रामुळे परिघातील वायुप्रदूषणाने गुणवत्ता धोकादायक पातळी ओलांडली
त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागीय अधिकारी यांनी त्यांना तपासणी अहवालानुसार प्रकल्पातील विविध युनिट मधील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार असलेले गंभीर आक्षेप समोर आल्याने त्यानुसार विज प्रकल्पाला “तुमच्या प्रकल्पाने पर्यावरणाचे नुकसान करणे , मानवी आरोग्यास बाधा निर्माण झाल्यामुळे आणी प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करता वारंवार उल्लंघन केल्यामुळे, तो बंद का करण्यात येऊ नये ? ” अशा आशयाची दोन वेळा नोटीस बजावलेली होती. त्याची देखील आता मुदत संपलेली असून त्याबाबत दीपनगर प्रशासनाने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काहीही उचित आणि आवश्यक उपाययोजना केलेल्या नसल्याची माहिती समोर आलेली आहे. आता पुढील आठवड्यात याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्या बैठकीत या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे.