जळगाव महापालिकेत तहसीलदारांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून ४३ जन्मदाखले जारी झाल्याचा प्रकार उघडकीस
मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता

जळगाव दि-03/04/2025, कधी भ्रष्टाचार तर कधी लाचखोरी तसेच नागरिकांना आवश्यक सेवा विहित मुदतीत न देण्याचा भोंगळ व अनागोंदी कारभारामुळे आणि सर्वेक्षणातील अहवालानुसार बदनाम झालेल्या जळगाव महापालिकेत आणखी एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चक्क जळगाव तहसीलदार यांच्या बनावट सह्या व शिक्का वापरून जन्म मृत्यू विभागातून तब्बल 43 जन्म दाखले काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे. या बनावट जन्म दाखल्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आता समोर आलेली असून याप्रकरणी महापालिका आणि तहसिलदार कार्यालय स्तरावर स्वतंत्र गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेली आहे. दोन महिन्यांपूर्वी मालेगाव मध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून बनावट जन्म दाखले जारी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आलेले होते. जळगाव शहरातही काही बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या बांगलादेशी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी या बनावट दाखल्यांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात जन्म नोंदणी करणे, तहसीलदार यांच्या नावाने बनावट शिक्के तयार करून त्यांचा वापर करणे, तसेच हे जन्म दाखले जारी करण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संबंधी आता सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे.
काय असते नोंदणीची प्रक्रिया
जळगाव महापालिकेच्या हद्दीत जन्म मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंद विभागात आढळून येत नसेल तर, महापालिकेकडून नोंद नाही असे प्रमाणपत्र घेऊन ते एका अर्जासह तहसीलदार किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करावे लागतात. त्याची पडताळणी करून तहसीलदार महापालिकेला संबंधित व्यक्तीच्या जन्माच्या दाखला देण्याचे आदेश पारित करीत असतात.
तब्बल 100 अनुक्रमांक नोंदी गायब ?
महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागातील सध्याच्या पान क्रमांक 27 वर 9231 या अनुक्रमांकाची नोंदणी असून त्यानंतर थेट 9332 हा अनुक्रमांक नोंदविण्यात आला आहे. त्याला वर्तुळही करण्यात आलेले आहे. त्यानंतर पान क्रमांक 28 वर ऑगस्ट महिन्यातील जन्म नोंदींचा तक्ता तयार करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्या तक्त्याच्या आधी केलेली सप्टेंबर महिन्याची जन्म नोंद ही नंतर अनुक्रमांकाची दिशाभूल करण्यासाठी केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पुढे पान क्रमांक 29 वर अनुक्रमांक 9333 पासून पुढे नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.म्हणजेच अनुक्रमांक 9232 ते 9332 या नोंदी नेमक्या कुठे करण्यात आल्या याची चौकशी आता होणार आहे.या अनुक्रमांकांचा दुरूपयोग करण्यात आलेला आहे का ? याची आता पोलीस चौकशी करण्यात येणार आहे.
हा प्रकार असा आला उघडकीस !
फेब्रुवारी महिन्यात तब्बल ५० प्रकरणे जन्म मृत्यू दाखला मिळणेसंदर्भात दाखल झालेली होती. या दाखल्यांच्या प्रकरणांची पडताळणी संबंधित कर्मचाऱ्यांनी केली असता, त्यांना यात तहसीलदार यांच्या सही व शिक्का याबाबत संशय निर्माण झाला. याबाबत अधिक चौकशी केली असता फक्त सातच सह्या या खऱ्या असून तब्बल ४३ सह्या या बनावट असल्याचे आढळून आलेल्या आहेत. तसेच सदर दाखले मिळविण्यासाठी संबधित व्यक्तींनी तहसीदारांचे आदेश न आणता एका व्यक्तीनेच ते सर्व आदेश महापालिकेत दखल केले आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा संशय वाढला व त्यांनी वरीष्ठांना ही बाब सांगितली.शहरातील सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालय बोगस दाखल्यांचे केंद्र बनले असल्याचे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांनी लागलीच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.