देशभरात 5000 कोटींचे ड्रग्स जप्त करणाऱ्या पुणे पोलीस पथकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर, राज्य शासनाची अधिसूचना जारी

पुणे दि-11/10/2024, ड्रग्स विक्री प्रकरणी देशभर गाजलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल असताना तेथून ललित पाटील हा आपला ड्रग्सचा व्यवसाय चालवित असल्याचे एका छाप्यानंतर उघडकीस आले होते. ड्रग्स पेडलर ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी पुण्यासह दौंडजवळील कुरकुंभ, सांगली जिल्ह्यातील कुपवाड, दिल्ली, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल येथे कारवाईवरुन तब्बल ५ हजार कोटींहून अधिक रक्कमेचा मेफेड्रॉनचा ( MD) साठा जप्त केला होता. नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील ड्रग्स निर्मिती कारखान्यावरही कारवाई केली होती. ही उत्कृष्ट कारवाई करणार्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) व त्यांच्या पथकाला राज्य शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे़. तशी अधिसुचना शासनाने आज जारी केली आहे. पुणे पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानेही मागविलेला असून येत्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते या पथकाला विशेष पुरस्कार दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्स विक्रीचा अड्डा उघडकीस आल्यावर त्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित पाटील काही पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. त्याचा परिणाम पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने त्याची पाळेमुळे खणून काढताना अगदी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला होता. हा निधी पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त यांना वितरीत करावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी कारवाईबाबत कामगिरीची नोंद घेऊन ही रक्कम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. गुन्हे शाखेत त्या वेळी सहायक पोलीस आयुक्त म्हणून सतीश गोवेकर आणि सुनील तांबे हे कार्यरत होते.सतीश गोवेकर हे आता सेवानिवृत्त झालेले असून सुनील तांबे हे पुणे पोलिस दलात विशेष शाखेत कार्यरत आहेत.