महाराष्ट्रमुंबईराजकीय

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यासह राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, :-  “माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे,  हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

टाटा मेमोरियल सेंटर,  ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचा भूमीपूजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला,  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई,  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे,  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण,  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  राहुल शेवाळे,  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,  कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,  ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे,  महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी, व्यापार, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद व प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले  मानणाऱ्यांपैकी आम्ही  आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. दि.३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. ही परंपरा धर्मवीर दिघे यांनी सुरू केली होती, त्यांच्यामुळेच आम्ही घडलो.  आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्यात येत आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाला लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते सरसंघचालक मोहन भागवत व आध्यात्मिक गुरु श्री.दीपक भाई हे उपस्थित आहेत, हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा वारसा मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे नेत आहेत. जितो ट्रस्टच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  कॅन्सर रोगामध्ये देशभरात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा रोग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा किलर रोग आहे. या रोगामुळे फक्त आजारी एकट्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनाच त्रास होतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. आस्थेचे व सेवेचे मंदीर आजूबाजूला होत आहे. या हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आजच्या काळाची गरज आहेत.  देशात नि:स्वार्थी भावनेने मोठ्यात मोठी व सामान्य व्यक्ती देखील समाजासाठी आणि देशासाठी चांगले काम करीत आहे. नजिकच्या काळात आपला देश सर्व चांगल्या बाबतीत पुढे असेल, असा विश्वास त्यांनी  शेवटी व्यक्त केला.

या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधांसह सहाशेहून अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील  असणार आहे, अशी माहितीही अजय आशर यांनी दिली.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button