नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री म्हणून मंत्री गिरीश महाजन यांची वर्णी,१० हजार कोटींचा निधी प्रस्तावित
नाशिक पालकमंत्री पदापेक्षाही मोठे पद कुंभमेळा मंत्री

दिनांक: २० सप्टेंबर, २०२५, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सन २०२७-२०२८ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम, २०२५ च्या कलम ३ अंतर्गत कुंभमेळा मंत्री समिती गठीत केली आहे. हा अधिनियम १० जुलै, २०२५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाला आहे. या समितीवर कुंभमेळ्यासाठी आवश्यक निधीचे नियोजन आणि वाटप यावर विशेष लक्ष देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील एक महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा आहे, ज्यामध्ये लाखो भाविक आणि पर्यटक सहभागी होतात. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी वाहतूक, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, सुरक्षितता आणि वाहनतळ यासारख्या पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी आणि काटेकोर नियोजन आवश्यक आहे. या उद्देशाने शासनाने कुंभमेळ्यासाठी विशेष निधी वाटप आणि त्याच्या प्रभावी वापरासाठी ही समिती स्थापन केली आहे. या कुंभमेळ्यासाठी तब्बल 10 हजार कोटींचा निधी प्रस्तावित आहे.
समितीची रचना
कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्षपद मंत्री गिरीश महाजन भूषवतील, तर खालील सदस्यांचा समितीत समावेश आहे:
1. श्री.गिरीश महाजन – कुंभमेळा मंत्री व समितीचे अध्यक्ष
2. श्री. छगन भुजबळ – सदस्य
3. श्री. राहुल भोसले – सदस्य
4. श्री. उमेश सामंत – सदस्य
5. श्री. जयकुमार रावल – सदस्य
6. श्री. दिवेंद्रसिंह भोसले – सदस्य
7. ॲड. माणिकराव कोकाटे – सदस्य
महत्त्वाचे निर्णय
समिती सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेईल आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधीचे नियोजन करेल.
निधीच्या प्रभावी वाटपाद्वारे वाहतूक, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य आणि सुरक्षितता व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करेल.
प्रशासकीय समन्वय साधून निधीचा योग्य वापर आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करेल.
कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजूर निधीचे वितरण आणि त्याच्या वापरावर देखरेख ठेवेल.
या समितीच्या माध्यमातून सिम्हस्थ कुंभमेळ्याचे आयोजन अधिक सुसंगत आणि यशस्वी होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.













