नेपानगर रेल्वे ट्रॅकवर 10 डिटोनेटरचा स्फोट टळला , लष्कराची विशेष ट्रेन थोडक्यात वाचली, मध्य रेल्वे हाय अलर्टवर
भुसावळ, दि-21/09/2024 भारतीय सैन्याच्या विशेष ट्रेनला डिटोनेटर बॉम्बने उडवण्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील नेपानगर रेल्वे रूळालगत उघडकिस आल्याने भुसावळ रेल्वे विभागासह देशात मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे विशेष पथक दाखल झालेलं असून ते नेपानगर येथे सखोल उच्चस्तरीय चौकशी करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर रेल्वे स्थानका जवळील रुळालगत दहा डिटोनेटर बॉम्ब लावून लष्कराची ट्रेन बॉम्बने उडवण्याचा कट दिनांक 18 सप्टेंबर रोजी उघडकीस आलेला आहे. लष्कराची विशेष ट्रेन पोहोचण्याच्या काही मिनिटे आधीच संबंधित रेल्वे विभागातील अधिकारी अलर्ट झालेले होते. भारतीय सैन्याच्या जवानांची ही विशेष ट्रेन जम्मू काश्मीरहून कन्याकुमारी येथे जात होती. मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकापासून अंदाजे 80 किलोमीटरवर ही डिटोनेटर स्फोटाची घटना घडलेली आहे.
भुसावळ विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या ट्रेनला सागफाटा या स्थानकावर थांबवण्यात आले होते. यामध्ये सुदैवाने मोठी दुर्घटना व जीवित हानी टळलेली आहे. या ठिकाणी तात्काळ मुंबई येथील राष्ट्रीय तपास संस्थेची टीम दाखल झालेली असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे स्फोट झालेले डिटोनेटर रेल्वे वापरत असलेल्या स्फोटकांशी मिळतेजुळते असल्याची प्राथमिक माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख डॉक्टर स्वप्निल निला यांनी दिलेली आहे. देशात गेल्या वर्षभरापासून अनेक अपघात झालेले असून यामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.