
भुसावळ – यावल तालुक्यातील पाडळसे (भुसावळ–फैजपूर मार्गावरील) शिवारात पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन पुन्हा एकदा करण्यात येत आहे. ही कथा १० मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार असून, या धार्मिक सोहळ्यासाठी दररोज २ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुन्हा आढावा बैठक आज सभास्थळी नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या बैठकीत या परिसरात उपद्रवी वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याचा विसर पडला होता. त्यासंदर्भात मिडियामेल न्युजने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेऊन आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तो मुद्दा उपस्थित केला आणि वनविभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत.

व्यापक नियोजन आणि सुविधा
कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विविध सुविधांची आखणी करण्यात आली आहे. सभास्थळाच्या एक किलोमीटर परिसरात कोणतेही खाजगी वाहन विनापरवानगी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालय, कंट्रोल रूम, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली.
भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर आदी भागांतून येणाऱ्या एसटी बस आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तापी नदीकाठावर जाण्यास पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभास्थळी सुमारे १०० स्टॉल उभारण्यात येणार असून, भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नदानासाठी विशाल किचनची व्यवस्था करण्यात येणार आहे,ज्यामुळे लाखो भाविकांना महाप्रसादाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अतिक्रमण हटविण्याचे आदेश
यावेळी भुसावळ शहरातील गांधी पुतळा ते तापी नदीपर्यंतच्या सर्व हातगाड्या व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले आहेत. तसेच नादुरुस्त वाहनांना तात्काळ हटविण्यासाठी टोईंग गाडी व क्रेनची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी बडगुजर, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, भुसावळच्या तहसीलदार निता लबडे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासह आरटीओ, पोलीस , महसूल पंचायत समिती, भुसावळ-फैजपूर-सावदा नगरपरिषद प्रशासन, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.













