भुसावळ दि-24/10/24, भुसावळात आज सायंकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषद घेत भुसावळ विधानसभेच्या जागेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दावा ठोकत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे भुसावळातील महाविकास आघाडीमध्ये “महाखळबळ” उडालेली आहे. कारण महाविकास आघाडीकडून भुसावळची जागा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखली जात होती. मात्र आज अचानक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी भुसावळात येत पत्रकार परिषद घेऊन या जागेसाठी तब्बल १७ उमेदवार इच्छुक असल्याने आणि जागेवर दावा ठोकल्याने भुसावळातील महाविकास आघाडीमध्ये प्रचंड महाखळबळ उडालेली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी पुण्यात जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत. या मुलाखती दिलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये आता गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यापैकी काहींनी गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजीला सुरूवात देखील केलेली होती. त्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार असे भासवले जात होते. मात्र या सर्व इच्छुक उमेदवारांचा आता भ्रमनिरास होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे ही जागा आता ऐनवेळी काँग्रेसला सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार आता काय भूमिका घेतात याकडे भुसावळातील जनतेचे लक्ष लागून आहे.
माजी आमदार संतोष चौधरी काँग्रेसमध्ये जाणार ?
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आलेली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्याची बातमी समोर आलेली होती. मात्र त्याबाबत माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोणताही खुलासा केलेला नव्हता. मात्र आता ते ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे तसे झाल्यास संतोष चौधरींची भूमिका देखील प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत देखील खूप महत्त्वाची असणार आहे. कारण त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग भुसावळमध्ये असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी बॅनरबाजी सुरू केल्यानंतर काही बॅनरवर आतापर्यंत माजी आमदार संतोष चौधरी यांचा फोटो किंवा चेहरा दिसून आलेला नसल्याने आता याबाबत चर्चांना उधाण आलेले आहे. त्यामुळे संतोष चौधरी यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्याच मर्जीतला उमेदवार या भुसावळ विधानसभा मतदारसंघात दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता भुसावळ विधानसभेची जागा नेमकी परंपरागत राष्ट्रवादीकडेच राहते की काँग्रेस पक्षाकडे जाते याकडे भुसावळ तालुक्यातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. भुसावळातील महाविकास आघाडीत उमेदवारीवरून एक प्रकारे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत काथ्याकूट‘ सुरू असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे आता हा खूप मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे.