भुसावळचे मुख्याधिकारी इ-लिलाव प्रक्रिये संदर्भात अडचणीत येण्याची शक्यता ? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे लक्ष
भुसावळ,दि-10/10/2024 भुसावळ शहरातील सिटी सर्वे नं.161 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल येथील गाळ्यांचा ई-लिलाव करणार असल्याची जाहिरात दि-01/10/2024 रोजी मुख्याधिकार्यांच्या नावाने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाली होती. मात्र सदरील व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ( complition certificate) नसून तसे पत्र नगरपालिकेच्या जा.क्र. भुनप/साबां/428 दिनांक 10/10/2024 या पत्रान्वये सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी आज दिलेले आहे.
यासंदर्भात दि-09/10/2024 रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे भुसावळ शहरातील सर्वे नं. 161 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल येथील गाळ्यांच्या लिलावास स्थगिती देण्यात यावी, याबाबत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तक्रार केलेली आहे. याबाबत केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना लिलावाबाबत कुठल्या कलमान्वये आपण पूर्णत्वाचा दाखल नसतांना जाहीर लिलाव करित आहात अशी विचारणा केली असता , त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी केली आहे. सदरील लिलाव प्रक्रियेला स्थगिती न दिल्यास मुख्याधिकारी राजेंद्र फातले व प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याविरूध्द मुंबई उच्च न्यायालयामार्फत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत याचिका दाखल करणार असल्याची माहिती, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी ‘मिडियामेल‘ न्युजला दिलेली आहे.
मुख्याधिकारी अडचणीत येण्याची शक्यता ?
दरम्यान, सदरील डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची ई-लिलाव प्रक्रिया राबवताना कायदेशीर बाबींची पूर्तता न करता त्रुटी राहून गेल्याने केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी याबाबत कोणाच्या चौकशीचे आदेश देतात की काय ? तसेच सदरील ई-लिलाव प्रक्रिया राबविताना वृत्तपत्रांमध्ये झालेल्या जाहिरातीचा खर्च हा मुख्याधिकारी यांच्याकडून वसुल करण्याचे आदेश देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मीडियामेल न्यूजने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर आज दिवसभर भुसावळ शहरासह परिसरात या लिलाव प्रक्रिये संदर्भातील चर्चांना उधाण आलेले होते.