भुसावळात एमडी ड्रग्स जप्त, जळगावचे Dysp यांच्या पथकाने भुसावळ शहरातून दोघांना घेतले ताब्यात
भुसावळात गेल्या वर्षी देखील एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते

भुसावळ दि-03/05/2025, भुसावळच्या गुन्हेगारी इतिहासामध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक गुन्ह्याची नोंद झालेली आहे. असे म्हटले जाते की ज्या अधिकाऱ्याने भुसावळात पोलिस सेवा दिली, तो ऑल इंडियात कुठेही नोकरी करू शकतो ,कारण इथे घडणारे सर्वच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि त्यांचा होणारा तपास हा भविष्यात संबंधित अधिकाऱ्यांना उपयोगी पडतो. भुसावळ अनेक गोष्टींनी पोलिस रेकॉर्डमध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये खून, गोळीबार, अवैध शस्त्र विक्री, नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक ,अवैध गुटखा, बनावट नोटा आणि शहरभर विस्तारलेला आणि खुलेआमपणे चालणारा अवैध सट्टामटका व्यवसाय याबाबत नेहमीच गुन्हेगारीच्या घटना नजरेस पडतात. आता त्यात ड्रग्सची भर पडलेली असून एमडी हे मादक पदार्थ बाळगत असल्याच्या संशयावरून जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी त्यांच्या पथकासह भुसावळ शहरात दोन जणांच्या घरात धाड टाकल्यानंतर 23 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे.यामुळे मोठी खळबळ उडालेली असून, यामुळे पुन्हा एकदा भुसावळ शहर चर्चेत आलेले आहे. याकूब खान आणि वारिस खान अशी अटक केलेल्या आरोपांची नावे असून त्यांच्या सोबतच जळगाव शहरातून अन्सार बिस्ती याला देखील अटक करण्यात आलेली असून त्यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात पूर्वीच्याच एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
2024 मध्ये सुद्धा भुसावळात ड्रग्स बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई झालेली होती. मात्र त्यानंतर त्या प्रकरणाचे पुढे काय झालं ? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा भुसावळ शहरात ड्रग्स पकडले गेल्यामुळे भुसावळात ड्रग्स विक्री होत असल्याचे समोर आलेले आहे. दरम्यान, जळगावचे ड्रग्स पेडलर हे भुसावळात देखील त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती आता समोर आल्याने भुसावळ शहरात ड्रग्सचा विळखा बसल्याचे दिसून येत असून ड्रग्सचे जाळे जिल्ह्याभरात आणखी खोलवर रूजले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ,दोन महिन्यांपूर्वी जळगाव येथील शाहू नगरात अबरार कुरेशी नामक ड्रग्स पेडलरच्या माध्यमातून ड्रग्स विक्री होत असल्याची गुप्त माहिती, जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित यांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी लागलीच सापळा रचत संबंधित ठिकाणी धाड टाकून 53 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केलेले होते. मात्र संबंधित आरोपी हा अजूनही फरार असून, त्याच्या शोधार्थ विविध पथके रवाना झालेली आहेत. मात्र तो दुबईत पळून गेल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे.
पीएसआय दत्तात्रय पोटे निलंबित
जळगावच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हा ड्रग्स पेडलर आरोपी असलेल्या अबरार कुरेशी याच्या संपर्कात होता.त्यांच्यात तब्बल 252 वेळा कॉलींग झाल्याचे सीडीआर रिपोर्ट मधून समोर आलेले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी त्याला गेल्याच आठवड्यात निलंबित देखील केलेले आहे.