भुसावळ : जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीत सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद; जागा बळकावण्याचा प्रयत्न ?
सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांची गैरसोय !

भुसावळ-दि- 06/12/2025, शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीत नगरपालिका मालकीच्या सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पत्रे लावून पूर्णपणे बंद केल्याने परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे शौचालय जामनेर रोडपासून अवघ्या १० मीटर अंतरावर रोहित्राजवळ आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही भूमाफिया या जागेवर डोळा ठेवून असून त्याच उद्देशाने हे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. शौचालय बंद झाल्याने परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सकाळी व संध्याकाळी शौचालयाची गरज असणाऱ्या नागरिकांना आता शहरातील रस्त्यालगत किंवा उघड्यावर जावे लागत असल्याने आरोग्याचा व नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची अद्याप भुसावळ नगरपालिका प्रशासनाला अधिकृतपणे कल्पना नसल्याचे दिसून येत आहे. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेलेली नाही, असे प्राथमिक माहितीवरून समजते.
परिसरातील सुजाण नागरिकांनी या प्रकाराकडे तात्काळ लक्ष देऊन बंद केलेले पत्रे हटवावेत व शौचालय पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच जागा बळकावण्याचा हा कट असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
आता नगरपालिका प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि या जागेच्या सुरक्षिततेची खात्री कशी करते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.













