Advertisement
क्राईम/कोर्टजळगाव

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावाजवळील खडका MIDC च्या जमिनीवर अवैध उत्खनन करणाऱ्या मुरूम माफियांवर कारवाई करा – रिपब्लिकन सेना

भुसावळ,दि-03/02/2026 : भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावाजवळ असलेल्या खडका औद्योगिक वसाहत (MIDC) च्या सरकारी मालकीच्या जमिनीवर गेल्या १५ दिवसांपासून मुरूम माफियांच्या टोळीने अवैध उत्खननाचा धुमाकूळ घातला आहे. जेसीबी आणि पोकलेन मशीनांच्या साहाय्याने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात मुरूम आणि मातीची चोरी सुरू असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन सेना, भुसावळ यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर औद्योगिक वसाहतीच्या जमिनीवर अंदाजे २ हजार ब्रासपेक्षा अधिक मुरूमची अवैध उत्खनन झाली आहे. यामुळे शासनाच्या १ कोटी रुपयांहून अधिक रॉयल्टीची चोरी झाली असून, पर्यावरणाला मोठी हानी पोहोचली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या जमिनीच्या सीमांकन खुणा (Boundary Stones) नष्ट करण्यात आल्या असून, भविष्यात जमिनीच्या मोजणीत गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, या माफियांना प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही धाक उरलेला नाही. अवजड वाहनांच्या (डंपर) सततच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, धुळीच्या प्रदूषणामुळे कन्हाळा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हे केवळ महसूल चोरीचे प्रकरण नसून, सामाजिक सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनला आहे.
प्रमुख मागण्या अशा:
1)उत्खनन क्षेत्राचा तात्काळ पंचनामा करून अनधिकृत उत्खननाची मोजणी करावी.
2)जेसीबी, पोकलेन आणि डंपर मालकांवर जप्ती व दंडाची कठोर कायदेशीर कारवाई करावी.
3)मुरूम माफियांच्या टोळीवर गुन्हे दाखल करून शासनाचा बुडालेला महसूल दंडस्वरूपात वसूल करावा.
4)महसूल विभागाच्या भरारी पथकाची गस्त वाढवावी आणि प्रमुख रस्त्यांवरील CCTV फुटेज तपासून वाहन क्रमांक शोधावेत.
रिपब्लिकन सेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील ४८ तासांच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.
या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून लवकरात लवकर तपास आणि कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भुसावळ एमआयडीसी परिसरात यापूर्वीही गौण खनिज तस्करीचे प्रकार समोर आले असून, राजकीय वरदहस्तामुळे हे गोरखधंदे सुरू राहत असल्याचे आरोप होत आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button