भुसावळ शहरातील विनापरवाना टू-व्हीलर शोरुम्सची आरटीओकडून तपासणीचे आदेश जारी; दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश
अनधिकृत शोरूम्स चालकांमध्ये खळबळ

जळगाव, दि-30/01/2026: प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी भुसावळ शहरातील विविध कंपन्यांच्या टू-व्हीलर (दुचाकी) शोरुम्सची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. या तपासणीदरम्यान मोटार वाहन कायदा 1988 चे उल्लंघन करणाऱ्या शोरुम्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढलेल्या आदेशात भुसावळ येथील टू-व्हीलर शोरुम्समध्ये आवश्यक कागदपत्रे, परवाने, नोंदणी नियम, प्रदूषण प्रमाणपत्रे, विक्री प्रक्रिया आदी बाबींची तपासणी करावी. यामुळे भुसावळ तालुक्यातील विनापरवाना सुरू असलेल्या टू-व्हीलर (दुचाकी) शोरुम्स चालकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.
आदेशाचे मुख्य मुद्दे:
1)भुसावळ शहरात कार्यरत असलेल्या सर्व टू-व्हीलर शोरुम्सची मोटार वाहन कायदा १९८८ आणि त्याअंतर्गतच्या नियमांनुसार पूर्ण तपासणी करावी.
2)तपासणीदरम्यान दोषी आढळणाऱ्या शोरुम्सवर तात्काळ कारवाई करावी (उदा. दंड, परवाना रद्द, सील इत्यादी).
3) तपासणी अहवाल न चुकता कार्यालयात सादर करावा.
हे आदेश सचिन बुरुड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी जारी केले असून, ते प्रभारी अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक, वायुवेग पथक क्र. ०२ यांना अनुपालनासाठी दिले आहेत.
या आदेशामागे एक संदर्भित निवेदन आहे, ज्यात भुसावळातील टू-व्हीलर शोरुम्समध्ये कागदपत्रांची कमतरता असल्याचे नमूद करून, आवश्यक तपासणी न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आरटीओने हे पाऊल उचलले आहे.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांच्या नेतृत्वाखालील जळगाव आरटीओ कार्यालय नियमितपणे वाहन नोंदणी, परवाना, आकर्षक क्रमांक, खाजगी वाहनांवरील गैरशासकीय पाट्या आदी बाबींवर कारवाई करत असते. भुसावळमधील या तपासणीतून नियमांचे पालन न करणाऱ्या शोरुम्सना लगाम बसवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
ग्राहक आणि दुचाकी खरेदी करणाऱ्यांनी अधिकृत, कायद्याचे पालन करणाऱ्या शोरुम्सकडूनच वाहने खरेदी करावीत, जेणेकरून नोंदणी, विमा, आरटीओ प्रक्रिया सुरळीत राहतील, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.













