हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याची 22 वर्षांपासून सुमारे 8 लाखांची माती चोरी; सुरक्षा व्यवस्था संशयास्पद
पाटबंधारे विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जळगाव, ३० जानेवारी २०२६ – जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील हतनूर धरणाच्या उजव्या कालव्यावरील शासकीय मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या या कालव्याजवळील सुमारे २७३९ ब्रास माती अज्ञात चोरट्यांनी टप्प्याटप्प्याने चोरून नेली असून, त्याची अंदाजे किंमत ७ लाख ९४ हजार ३१० रुपये (सुमारे ८ लाख रुपये) इतकी आहे.
घटना रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, हतनूर धरणाच्या उजव्या कालव्यावर साखळी क्रमांक ५५२० मीटर जवळ, तासखेडा-थोरगव्हाण रस्त्याच्या पुलाजवळ ही मातीचा साठा होता. ही चोरी सन २००३ ते २०२५ या प्रदीर्घ २२ वर्षांच्या कालावधीत हळूहळू पार पडली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे.
हतनूर धरणाचे शाखा अधिकारी भावेश संजय चौधरी यांनी या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध शासकीय मालमत्तेच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल नारायण गजरे करीत असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे आणि सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
या प्रकारामुळे पाटबंधारे विभागाच्या शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.













