मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आता आ.एकनाथ खडसेंनाही बदनामी केल्याप्रकरणी मानहानी नोटीस जारी
उन आणि राजकारणामुळे जिल्हा तापणार

जळगाव, दि-१४/०४/२०२५, पत्रकार अनिल थत्ते यांनी त्यांच्या अनिल गगनभेदी थत्ते या युट्युब चॅनेल वरून काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आय.ए.एस. अधिकाऱ्यांशी संबंध असून महाजन यांनी अनेक वेळा रात्री शंभरपेक्षा जास्त वेळा सदरील महिला अधिकाऱ्यांना कॉल केल्याचा दावा केलेला होता. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांचे एका महिला आय.ए.एस. अधिकाऱ्यांशी संबंध असून त्यांचे नाव त्यांना माहित असल्याचा दावा केला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांमधून हा विषय प्रचंड चर्चेत आला होता. याबाबत प्रचंड गदारोळही झालेला होता. आमदार एकनाथ खडसेंनी केलेल्या त्या कथित दाव्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर मागील आठवड्यात जळगावमध्ये उत्तर देताना सांगितले होते की, ” एकनाथ खडसेंनी केलेल्या दाव्यावर लवकरच निर्णय घेऊ ” असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आज अनिल थत्ते आणि आमदार एकनाथ खडसे या दोघांनाही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता यावर पुढे काय घडामोडी घडतात, याकडे जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे.













