महान उद्योगपती व आदर्श व्यक्तिमत्व रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी, एक दिवसाचा दुखवटा जाहीर
मुंबई दि-10/10/2024 भारतीय उद्योग जगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि महान ज्येष्ठ उद्योगपती असलेल्या श्री रतन टाटा जी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत एका खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव एनसीपीए मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतले आणि विकासातील त्यांचे अतुल्य योगदान भारतातील तसेच भारताबाहेरील उद्योजकांना सदैव प्रेरणा देत राहील. त्यांचे व्यक्तिमत्त्व दृढ बांधिलकी जपणारे आणि करुणामयी होते. सेवाभावाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले अमुल्य योगदान आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रता म्हणजे आत्मसात केलेल्या निती मूल्यांचे ठळक प्रतिबिंबच होते.त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर एक नजर टाकली तर ते केवळ उद्योजकच नाही ,तर उदार, दानशूर आणि लोकांसाठी आदर्श व प्रेरणास्थान होते. त्यांचे मुक्या प्राण्यांप्रति असलेले प्रेम देखील जगजाहीर आहे. मुक्या प्राण्यांसाठी त्यांनी मुंबईतील टाटा हाऊसमध्ये पशुसंवर्धन व वैद्यकीय केंद्र सुद्धा उभारले आहे.
भारतीय उद्योग जगतातील हे ‘दिग्गज’ व्यक्तिमत्त्व आपल्या मागे चिरंतन वारसा सोडून जात आहे, अवघा भारत त्यांच्या आठवणी चिरकाल जिवंत ठेवेल. या दु:खाच्या क्षणी ‘ मिडियामेल न्युज ‘ ग्रुप त्यांचे कुटुंबीय, मित्र, चाहते आणि संपूर्ण टाटा समूहाप्रती संवेदना व्यक्त करतो.आदरणीय टाटांचे सेवाभाव आणि दानशूरतेच्या बाबतीत त्यांचे योगदान अमूल्य आहे. मी त्यांचे कुटुंबीय, टाटा समूहाची संपूर्ण टीम आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करते.
पद्मविभूषण आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित या व्यक्तिमत्वाने टाटा समूहाचा महान वारसा पुढे नेला आणि जागतिक पटलावर त्याला अधिक प्रभावी स्थान मिळवून दिले. खरं तर ते ‘भारतरत्न’ चे प्रबळ दावेदार होते. त्यांनी आपल्या सारख्याच अनेक अनुभवी व्यावसायिक उद्योजकांना तसेच युवा विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
श्री रतन टाटा जी म्हणजे एक दूरदर्शी उद्योगपती, सहृदय व्यक्तिमत्व आणि एक विलक्षण माणूस होते. भारतातील एका सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठेच्या व्यावसायिक घराण्याला त्यांनी एक स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्याचवेळी त्यांनी दिलेले योगदान हे बोर्डरूमच्याही पलीकडचे होते.
रतन टाटा जी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात अनोखा पैलू म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि परतफेड करण्याची त्यांची आसक्ती. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पशु कल्याण अशा अनेक सामाजिक क्षेत्रांत त्यांनी आघाडीवर राहून काम केले आहे.
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा
महान ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.