रावेर दि-०४/११/२४, रावेर विधानसभेच्या रिंगणात आता माघारी नंतर नऊ उमेदवार रिंगणात राहिलेले असून यात भाजपचे अमोल जावळे, काँग्रेसचे धनंजय चौधरी ,वंचितच्या शमिभा पाटील आणि प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांनी बंडखोरी करत त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या ठिकाणी मोठी पंचरंगी लढत होण्याची शक्यता असून प्रस्थापितांना दारा मोहम्मद हे घाम फोडणार असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे यावल-रावेर विधानसभेत असलेली मुस्लिम समाजाची निर्णायक मते आणि दारा मोहम्मद यांची रावेर, यावल, फैजपूर शहरासह मुस्लिम समाजात असलेली लोकप्रियता काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरुवातीला विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय चौधरी यांना जाहीरपणे ‘लाँच’ केलेले होते. मात्र रावेर तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना शिरीष चौधरी यांची ही एकतर्फी भूमिका मान्य झालेली नव्हती. त्यात काँग्रेसच्या इतर नेत्यांसह दारा मोहम्मद यांचाही समावेश होता. तसेच गतकाळात झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऐनवेळी एका जेष्ठ नेत्याच्या उमेदवारीचा विश्वासघात झाल्यामुळे त्याची परतफेड करण्यासाठी आता काँग्रेसचे काही दुःखी आत्मे आता सक्रिय झालेले असून त्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी ते सोडणार नसल्याचे बोलले जात आहे. काही काँग्रेसच्या नेत्यांनी तर धनंजय चौधरींनी साधी ग्रामपंचायत निवडणूक ही न लढवता थेट विधानसभेची निवडणूक लढवत असल्याने काँग्रेस हाय कमांडच्या आदेशावर जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे दारा मोहम्मद यांची उमेदवारी कायम राहणे हे काँग्रेसच्या धनंजय चौधरी यांच्यासाठी मोठी परिणामकारक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
२०१४ च्या ‘गफ्फार मलिक’ पॅटर्नची पुनरावृत्ती ?
यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातील 2014 च्या निवडणुकीत तत्कालीन भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे हे विजयी झालेले होते.त्यांना ६५९६२ मते पडली होती,तर त्यांचे प्रमुख विरोधक असलेले काँग्रेसचे पराभूत उमेदवार शिरीष चौधरी यांना ५५९६२ इतकी मते पडलेले होती.
तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पै.अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१२७१ मते घेतली होती. त्यामुळे त्यावेळी काँग्रेसची बहुतांश मते त्यांना मिळाल्याने त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव झालेला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या मतदारसंघात लोकप्रिय दमदार मुस्लिम चेहरा अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन भाजप आणि काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार यांचे राजकीय वारसदार आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने यावर-रावेर विधानसभा निवडणुकीत २०१४ च्या पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का ? याकडे जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.