यावल शहरासह तालुक्यात सट्टामटका जोरात, दररोज होतेय लाखोंची उलाढाल, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
सट्टापेढी मालकांची होतेय लाखोंची कमाई
यावल दि- 22 एकीकडे राज्य शासन राज्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करत असताना दुसरीकडे मात्र विरोधाभास निर्माण व्हावा,अशी परिस्थिती जिल्ह्यातील काही ठराविक भागात दिसून येतेय. जळगाव जिल्ह्यातील यावल शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सट्टामटका सुरू खुलेआमपणे असून यातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.
यावल शहरात तर अगदी यावल पोलिस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या परिसरात, पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या चहाच्या टपरीवर, बस स्थानक परिसर , आठवडे बाजार परिसर ,सुंदर नगरी, सुदर्शन चित्र मंदिर परिसर याठिकाणी अनेक टपऱ्यांवर सट्टयाचे आकडे खुलेआम लिहिले जात आहे. यात कल्याण-वरळी, मिलनडे यांसारख्या अनेक सट्टा कंपन्यांचे आकडे लिहिणारे दररोज लाखो रूपयांची उलाढाल करत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावल शहरात तीन सट्टापेढ्या सुरू असून पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांचा कारभार सुरळीत सुरू आहे. या सट्टा जुगारामुळे तरूण सट्टयाच्या आहारी जाऊन घरातील पैसा वाया घालवत आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आता यावल पोलीस प्रशासन या सट्टा जुगारावर काय कारवाई करते ,हे पाहणे नागरिकांसाठी औत्सुक्याचे राहणार आहे.