रेल्वे भरती परिक्षा घोटाळ्यासंदर्भात सीबीआयच्या मुंबईसह देशभर धाडी, रेल्वे अधिकारी व खाजगी कंत्राटदारांची चौकशी
रेल्वे अधिकारी व खाजगी कंत्राटदारांची चौकशी
मुंबई दि-15, #Railway bharati Exam scam,केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात तसेच इतर ठिकाणी रेल्वे भरती बोर्डाने घेतलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अर्थात (GDCE) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित घोटाळ्यात पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून एकाच वेळी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात मधील रेल्वे परीक्षा केंद्रे आणि रेल्वे अधिकारी कार्यालये तसेच रेल्वेच्या विविध विभागांतील कंत्राटदार असलेल्या एका खासगी कंपनीशी संबंधित असलेले कार्यालय अशा 12 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकलेल्या आहेत.
या धाडी प्रामुख्याने मुंबई, नागपूर, बडोदा, अहमदाबाद, राजकोट , नवसारी, इंदोर, जबलपूर,भोपाल या शहरात पडलेल्या आहेत. या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना परीक्षेची संबंधित कागदपत्रे व इतर इलेक्ट्रॉनिक्स पुरावे व लॅपटॉपमध्ये महत्वाची माहिती सापडलेली आहे.
Sources by CBI
या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अर्थात (GDCE) च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाखाली रेल्वेचे काही अधिकारी व खाजगी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी असलेल्या काही अज्ञात जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या परीक्षेची संबंधित प्रश्नपत्रिका काही उमेदवारांकडे व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ॲप वरती उपलब्ध होती, असा सीबीआयचा आरोप आहे.
भारतीय रेल्वे बोर्डाने राबविलेल्या जीडीसीई च्या कोट्यातून 3 जानेवारी 2021 रोजी रेल्वेमध्ये बिगर तांत्रिक श्रेणी, कनिष्ठ लिपिक तथा लघुलेखक या पदांसाठी संगणकावर आधारित ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ अर्थात CBT परिक्षा घेण्यात आलेली होती. मुंबई,अहमदाबाद सुरत ,बडोदा, इंदोर , राजकोट सहा शहरांतील 28 परीक्षा केंद्रांवर 8603 उमेदवार सहभागी झालेले होते.
या परीक्षेसाठी ‘एक्झामिनेशन कंडक्टींग एजन्सी’ तथा परीक्षा संचालन संस्थेची नियुक्ती करण्यात येऊन या संस्थेकडे परीक्षा संचालनाची जबाबदारी देण्यात आलेली होती. तथापि GDCE परीक्षेला बसलेल्या काही उमेदवारांकडून या जबाबदार असलेल्या संस्थेच्या काही कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी अन्य खाजगी पंटरांमार्फत उत्तरांसह प्रश्नपत्रिका पुरविल्या होत्या. काही उमेदवारांना व्हाट्सअप वरती वैयक्तिकरित्या उत्तरपत्रिका संदेश पाठवण्यात आलेले होते, तर काहींना टेलिग्राम ॲप वरती प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पाठवण्यात आलेल्या होत्या, तसेच काहींना मेळावा घेऊन प्रश्नपत्रिका दाखवण्यात आलेल्या होत्या, असा सीबीआयचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने या घोटाळ्याची सखोल चौकशी सुरू केलेली असून येणाऱ्या काळात याची व्याप्ती किती आहे ? हे लवकरच कळणार आहे.