लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार ? मंत्री अदिती तटकरेंनी सांगितली महत्त्वाची माहिती
तांत्रिक कारणांमुळे झाला विलंब

मुंबई दि-02/05/25, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची राज्यातील कोट्यवधी महिलांना अजूनही प्रतीक्षाच आहे. गेल्या एप्रिल महिन्यात बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याचा दावा केला होता. मात्र अजूनही रक्कम जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठा हिरमोड झालेला आहे.
आता मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटद्वारे दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.