2 वेगवेगळ्या नंबर प्लेटच्या एर्टीगा कारने राष्ट्रीय महामार्गावर 5 मजूरांना उडवले, कारमध्ये पोलिसांचे ड्रेस व काठ्या !

भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर हरताळा फाट्याजवळील उड्डाण पुलाच्या खाली आज एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात उलट्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती अर्टिगा कारने रस्त्याने जाणाऱ्या 5 मजुरांना उडवलेले असून कारमधील चालक फरार झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही अर्टिगा कार उलट्या दिशेने वेगात येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या पाच जणांना जोरदार धडकली. या अपघाताच्या धडकेत जखमी झालेले हे पाच जण म्हणजे प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी व ज्ञानेश्वर कोळी हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर धडकेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनीही लगेच मदतीसाठी पुढाकार घेतला. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तात्काळ जवळच्या मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उत्तम उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघाताबाबत एक खळबळजनक बाब समोर आली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये दोन नंबर प्लेट (दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट) आढळल्या आहेत. तसेच कारमध्ये पोलिसांचा ड्रेस आणि काठ्या सापडल्याच्या प्राथमिक माहितीमुळे, ही कार लटमार किंवा संशयास्पद कारवाई करणाऱ्यांची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत खुलासा झालेला नाही. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताचा सखोल तपास सुरू केला असून, स्थानिक नागरिकांनी या अपघातात तातडीने मदत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.









