मुंबई दि:12 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल तडकाफडकी आज सायंकाळी दिल्ली दरबारी दाखल झालेले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या या दिल्ली दौऱ्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आता आम्ही सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आमचा वाटा असेलच. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्येही आमचा सिंहाचा वाटा असेलच”, “आम्ही इथे कोणताही मुद्दा घेऊन आलेलो नाहीत. मुद्दे असतील तर आम्ही सरकारमध्ये का सहभागी झालो असतो ? आम्ही एक राजशिष्टाचार म्हणून इथे आलो आहोत”,असंही पटेल यांनी स्पष्ट केले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझी काल मध्यरात्री भेट झाली. त्यावेळी आमची खातेवाटपावर सविस्तर चर्चा केली. सर्व गोष्टी क्लिअर आहेत”, असा पुनरुच्चारही पटेल यांनी केला.
केंद्रात 2 मंत्रीपदांसाठी “महाशक्तींची” भेट
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत सत्तेतील वाटा म्हणून राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रीमंडळात किमान दोन मंत्री पदे पदरात पाडण्यासाठी “महाशक्तींकडे” जोरदार लॉबिंग करत असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. यासाठीच ते “दोघे” तडकाफडकी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. येत्या 18 जुलै रोजी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ची बैठक आयोजित करण्यात आलेली असून यात राष्ट्रवादीच्या केंद्रातील दोन मंत्री पदांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.यातील एक मंत्री पद हे प्रफुल्ल पटेल यांना मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.